यवतमाळ जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरतोय..; “सावध रहा.. सुरक्षित रहा..”हाच उपाय

विदर्भ

यवतमाळ,| राजेश ढोले दिनांक २९ मे

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्यांची संख्या सध्या कमी असली तरी चोरी चोरी चुपके चुपके जिल्हाभर कोरोना हळूहळू पाय पसरत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आलेली कोरोना बाधितांची यादी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा देणारी आहे.

कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १० जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गुरुवारी रात्री २३ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १० पॉझेटिव्ह, १ निगेटिव्ह आणि एक रिपोर्ट अचूक निदान नसल्याचे कळविण्यात आले आहे.

पॉझेटिव्ह रुग्णांपैकी ८ जण दिग्रस येथील तर २ जण पुसद येथील आहेत. हे सर्व जण पॉझेटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) आहेत. दिग्रस येथील ६ जण एकाच कुटुंबातील आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे.

जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या संकटाचा सामना अहोरात्र करीत आहे. मात्र असे असतांना दिग्रस येथे मुंबईवरून आलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणात(होम क्वारनटाईन) ठेवण्याचे सक्त आदेश असतांना त्यांनी कुटुंबासह पार्टी केली. यातून ते पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्यामुळे या सर्वांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे सक्त पालन करणे आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. मुंबईवरून आलेल्या या नागरिकांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली असून एकूण पॉझेटिव्ह रुग्ण १२३ झाले आहेत. यापैकी ९९ जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत, असे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *