राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या ब्लिट्झ ग्रँड-प्रिक्स च्या पाच ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

क्रीड़ा

पुणे, दिनांक २९ मे

कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत बुद्धिबळपटूंना ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा खेळणे हा एकमेव पर्याय आहे. जगात सर्वत्र ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा जोमात सुरू असून त्यात बहुतांश बुद्धिबळपटू रमले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने भव्य खुल्या ब्लिट्झ(अतिजलद) ग्रँड-प्रिक्सच्या पाच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या पाच स्पर्धेसाठी १ लाख ५५ हजार रुपयाची एकूण रोख बक्षिसे ठेवली आहेत.प्रत्येक स्पर्धेसाठी पहिल्या वीस क्रमांकास एकूण २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे असून प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या दहा क्रमांकास अनुक्रमे दहा ते एक याप्रमाणे ग्रँड-प्रिक्स गुण दिले जाणार आहेत. या सर्व पाच स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक ग्रँड-प्रिक्स गुण मिळवणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंना 1)दहा हजार 2)आठ हजार 3)सहा हजार 4)चार हजार 5)दोन हजार याप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रत्येक स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण दहा फेरीमध्ये होणार असून प्रत्येक खेळाडूस फक्त तीन मिनिटांचा वेळ असणार आहे.लेटसअप हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.ही स्पर्धा सर्व बुद्धिबळपटूसाठी खुली असल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील व परदेशातीलही बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

३ जून पासून ते १ जुलै पर्यंत प्रत्येक बुधवारी रात्री आठ वाजता एक स्पर्धा होणार आहे. पहिली स्पर्धा ३ जून रोजी होणार असून ही स्पर्धा नोवेल फायनान्शियल सोल्युशन्स,नाशिक ने पुरस्कृत केली आहे. दुसरी स्पर्धा १० जून रोजी होणार असून ही स्पर्धा नरेंद्र फिरोदिया युनिकॉर्प,अहमदनगरने पुरस्कृत केली आहे. तिसरी स्पर्धा १७ जून रोजी होणार असून ही स्पर्धा ॲमनोरा पार्क टाउन,पुणे ने पुरस्कृत केली आहे. चौथी स्पर्धा २४ जून रोजी होणार असून ही स्पर्धा जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव ने पुरस्कृत केली आहे तर अंतिम पाचवी स्पर्धा १ जुलै रोजी होणार असून ही स्पर्धा चितळे डेअरी, सांगली ने पुरस्कृत केली आहे. या स्पर्धा चेस बेस इंडियाच्या प्ले चेस डॉट कॉम वर होणार आहेत.या स्पर्धेतील एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी अडीचशे रुपये प्रवेश शुल्क आहे.सर्व पाच स्पर्धेत भाग घेण्यासाठी सवलतीमध्ये एकूण १ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी https://mcagrandprix.chessbase.in/ या संकेत स्थळावर संपर्क साधावा असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी संयुक्तपणे पत्रकाद्वारे कळविले आहे.अधिक माहितीसाठी रोहित ८००७९४४६७५ व निरंजन गोडबोले ९६७३००३७८० तसेच रजिस्ट्रेशन साठी काही अडचण आल्यास शहीद अहमद ९०३८१३९५१०यांचेशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *