आंदोलन : चुकीचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणारे थायरोकेअर लॅब मनसेने पाडले बंद

मुंबई

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक ८

थायरोकेयर या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करून ही लॅब बंद पाडली.
सध्या कोरोनाचा सर्वत्र जोरदार प्रसार होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोना टेस्टसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु काही खासगी लॅब यामध्येदेखील हेराफेरी करत असल्याचा आरोप आहे. थायरोकेयर लॅबने तर नागरिकांची घोर फसवणूक करण्यास सुरुवात केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
थायरोकेअर लॅबमधून खोटे रिपोर्ट मिळत असल्याच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत. ठाणे, पनवेल, मुंबईतल्या अनेक लॅब्स बंद करण्यात आल्या खऱ्या परंतु, त्यांचं पनवेल येथील मुख्य टेस्टिंग सेंटर मात्र सुरुच होते. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज तुर्भे येथील थायरोकेअरच्या मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या आंदोलनानंतर सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरली. तसंच पुढील सर्व रिपोर्ट येईपर्यंत थायरोकेयर लॅब्स संपूर्णपणे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाण्यातही महापालिकेची कारवाई

कोरोना काळात रुग्णांसोबत मनमानी वर्तन करणे ठाण्यातील दोन खाजगी रुग्णालयांना चांगलेच भोवले आहे. अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यासह नाहक भीती दाखवून रुग्णांना दाखल केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन खासगी रुग्णालयांना तब्बल १६ लाख रुपये दंड आकारला आहे. बहुदा,राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयाविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन रुग्णालयांनी अनेकांना दाखल करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती. याबाबत तक्रारी आल्यावर ठाणे महापालिकेने चौकशी करुन ही कारवाई केली आहे. दरम्यान, याआधी कोरोना टेस्ट करणाऱ्या थायरोकेअर नामक खाजगी लॅबवरही पालिकेने कारवाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *