इशारा : कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे ; जागतिक आरोग्य संघटना

आंतरराष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता दिनांक ९ जून

कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगाचे चक्र थांबले आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील चिंताजनक आहे. जगभरातील देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे उध्वस्त होऊ लागली आहे. अनेक देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपापल्या देशातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागू केलेले लॉक डाऊन उठविणे सुरू केले आहे.एकीकडे अनेक देश लॉकडाउन शिथील करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याचं म्हटलं आहे.

सोमवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. अमेरिकेत सध्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूवरुन आंदोलनं सुरु असून जागतिक आरोग्य संघटनेने आंदोलनकर्त्यांना सुरक्षेची सर्व काळजी घ्या असा सल्ला दिला आहे.

पूर्व आशियानंतर युरोप हे कोरोनाचं केंद्रबिंदू ठरलं होतं. पण आता अमेरिकेने सर्वांना मागे टाकल्याचं चित्र आहे. युरोपमध्ये परिस्थती सुधारत असली तरी जागतिक स्तरावर मात्र ती बिघडत चालली आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनावा येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.

“गेल्या १० दिवसांत कोरोनाची १ लाख प्रकरणं समोर आली आहेत. रविवारी जवळपास १ लाख ३६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. रविवारी जी आकडेवारी आली त्यामधील ७५ टक्के रुग्ण हे एकूण १० देशांमधील होते. यामध्ये अमेरिका आणि दक्षिण आशियाची आकडेवारी सर्वाधिक आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

टेड्रोस यांनी यावेळी सांगितलं की, “ज्या देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे तिथे आत्मसंतुष्ट असणं हा सर्वात मोठा धोका आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. महामारीला जवळपास सहा महिने झाले आहेत. कोणत्याही देशाने लगेच यामधून बाहेर पडणं योग्य नाही”.

करोनामुळे जगभरात आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास ७० लाख लोकांना लागण झाली आहे. डिसेंबर महिन्यात चीनमधून करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *