क्वारंटाईन डान्स : यवतमाळ जिल्ह्यात विलगीकरण कक्षात तरुणांचा डान्स

विदर्भ

यवतमाळ, दिनांक ९ जून

महागाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या तरुणांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. खई के पान बनारस वाला.. या गाण्यावर थिरकणाऱ्या विलगीकरण कक्षातील तरुणांच्या झिंगाट नृत्याने त्यांच्या चेहऱ्यावरील कोरोनाविषाणूची भीती काही अंशी दूर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका सध्या कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. मुंबईहून परतलेले अनेकजण तालुक्यात कोरोना संसर्ग वाहक ठरले आहेत. महागाव येथील एका सराफा व्यावसायिकाचा गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. तर त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तालुक्यात कोरोनाबधितांची संख्या ११ वर गेली आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या किमान ५२ जणांना जिल्हा प्रशासनाने महागाव येथेच उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. या कक्षात असलेले व्यक्ती विरंगुळा म्हणून विविध खेळ खेळतात, मोबाईलवर आपला वेळ घालवितात. तर, येथील चार तरुणांनी विरंगुळा म्हणून केलेले झिंगाट नृत्य समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे.

विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तरूणांच्या नृत्याची चर्चा आणि व्हिडीओ जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यापर्यंतही पोहचला. कोरोनाच्या सावटाखाली विलगीकरणातील लोक या पद्धतीने व्यक्त होऊन आनंद घेत असतील तर त्यात वावगे काही नाही. मात्र नियमांचे पालन करावे आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. महागावात दाखल असलेल्यांपैकी अनेकांचे अहवाल निगेटिव्ह येत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सोमवारी रात्री यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्‍यात क्वारंटाईन कक्षात दाखल असलेले तरुण खईके पान बनारसवाला.. या गाण्यांवर नृत्य करताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *