डॉ. भास्कर खैरेंसह तिघांना निलंबनाची शिक्षा.. इतरांना मात्र बचावाची भिक्षा..!

जळगाव

जळगाव,दिनांक १२ जून

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (कोविड रुग्णालय) भुसावळ येथील बेपत्ता वृद्ध महिलेचा तब्बल नऊ दिवसांनी रुग्णालयाच्या शौचालयात मृतदेह आढळल्या प्रकरणी अखेर अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव सुरेंद्र प्र. चानकर यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात झालेल्या निष्काळजीपणाची जबाबदारी तिघांवर ढकलून इतरांचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्हा कोविड रग्णालयात सुविधांची वानवा असल्याबद्दल सातत्याने ओरड होत असताना सुस्तावलेल्या प्रशासनाने केवळ आदेशांची मलमपट्टी करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. समन्वयाचा अभाव असल्याने जळगाव जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर भारतात सर्वाधिक आहे. रुग्णांच्या शौचालय ,आंघोळीपासून ते जेवणापर्यंत सर्वच बोंबाबोंब असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वाट पाहावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रुग्णालयाची जबाबदारी एकट्या अधिष्ठाताडॉ. भास्कर खैरे यांच्यावर ढकलून इतरांना वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यामधील वादामुळे कोविड उपचारात राजकारण रंगल्याचे निदर्शनास येते आहे.

डॉ.भास्कर खैरे यांना कोंडीत पकडण्याची आयती संधी मालती नेहते या वृद्ध महिलेच्या शौचालयात आढळलेल्या मृत्यू प्रकरणामुळे मिळाली. मालती चुडामन नेहते या कोविड बाधित रुग्णास १ जून रोजी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी २ जून पासून सदर महिला दवाखान्याच्या वार्डमध्ये नसल्याचे या दिवशी वार्डात ड्युटी असणाऱ्या परिचारिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. कल्पना धनकवार आहेत यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर तब्बल आठवड्यानंतर दिनांक १० जून रोजी मालती नेहते या वृद्ध महिलेचे प्रेत दवाखान्याच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात आढळून आले. याबाबत अक्षम्य कुचराई केल्याचा ठपका ठेवून डॉ. भास्कर खैरे,डॉ.सुयोग चौधरी,डॉ.कल्पना धनकवार यांना निलंबित करण्याचे आदेश निघाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कारवाई करण्याचा शिफारस अहवाल पाठविला. खरेतर कोविड रूग्णालयाच्या तक्रारी सातत्याने होत असल्याने काहीतरी गडबड व राजकारण असल्याचे दिसत होते. एकाच वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय अशा दोन यंत्रणा कोविड रुग्णालयात असल्याने या यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची त्यांच्यातील वादावर डागडुजी करण्यात आली नाही. ठराविक डॉक्टरांच्या कोरोना कक्षात ड्युटी लावून इतर डॉक्टरांना सूट मिळत असल्याचेही समोर आले आहे. ज्युनियर डॉक्टरांच्या भरवश्यावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे चक्क बावीस कोरोना बाधित रुग्णांचे अहवालच गायब झाले. यामागे काहीतरी नक्कीच राजकारण दडले असावे अशी शंका घेण्यास वाव मिळतो. मालती नेहते ही कोरोना बाधित ८२ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची तक्रार २ जूनला पोलिसात दाखल केली गेली. तेव्हापासून तर वृद्धा दवाखान्याच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आल्यापर्यंतचे पोलिसांनी केलेला तपास याबाबतही शंकास्पद स्थिती आहे. यात भुसावळच्या रेल्वे दवाखान्याने केलेली चूकही कारणीभूत आहे. मालती नेहते जळगावच्या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी रेल्वे दवाखाना भुसावळ येथे उपचार घेत होत्या. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रेल्वे दवाखान्याने मालती नेहते यांना जळगावात उपचारासाठी रवाना केले. मात्र जळगाव येथे रवाना करताना रेल्वे दवाखान्याने मालती नेहते यांच्या आडनावात चूक करून मालती सुलाने असे लिहून पाठवले. या महिलेच्या कुटुंबियांनी तिची विचारपूस तिच्या मूळ नावाने केली. मात्र त्या नावाची महिला रुग्णालयात दाखल नाही असे त्यांच्या कुटुंबियांना कोविड दवाखान्याकडून सांगण्यात आले. अर्थात कोविड रुग्णालयाकडून या महिलेचा शोध तिच्या मूळ नावानेच घेतला गेला. रेल्वे दवाखान्याने मालती नेहते यांच्या आडनावात चुक केली नसती तर कदाचित ही वृद्ध महिला लवकर सापडली असती. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे तर जिल्ह्याच्या आपत्कालीन निवारण व्यवस्थापनाचे प्रमुख असल्याने कोरोना पासून बचावाची प्रमुख जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न जरूर केलेत. पण हे प्रयत्न कोविड रुग्णालयातील उपाय योजनांपेक्षा जिल्ह्यातील लाॅक डाऊन अंमलबजावणी करण्यासाठी जास्त आहेत.त्यांनी सातत्याने आदेशावर आदेश दिले. मात्र त्यावर अंमलबजावणी होत आहे की नाही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यासंदर्भात त्यांच्याविषयी शहरात व जिल्ह्यात प्रचंड नाराजी असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून तब्बल २८० आदेश निघाले असल्याचे दिसून येते.कोवीड रुग्णालयात प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोविड रूग्णालयात दाखल रुग्णांना कोणकोणत्या सुविधा मिळाल्या..? रुग्णांच्या उपचारासाठी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांनी समवेत घेतलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी खरच झाली का…? आरोग्य दुताचे लेबल लावून मिरवणाऱ्या खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप का खपवून घेतला गेला..? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय अशा दोन यंत्रणांमधील वादाला पडद्यामागे राहून खतपाणी घालणारे निश्चितच कोणीतरी झारीतले शुक्राचार्य असावेत. दोन्ही रुग्णालयांचे कार्यालय अधीक्षकांची जबाबदारी व भूमिका काय..? जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपविण्यात आली आहे..?, या सर्वांचा विचार करता पूर्णपणे नियोजनशून्य उपाययोजना करण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या.प्रशासन, आरोग्य यंत्रणा अपयशासाठी जबाबदार आहेत.

आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे येण्यापूर्वी जो गलथान कारभार रुग्णालयात पाहायला मिळाला ‌ तो टोपे यांच्या दौऱ्यानंतरही कायमच आहे.नाही म्हणायला टास्क फोर्सची निर्मिती, काही रुग्णालय अधिग्रहीत करणे, कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याने डेथ ऑडिट करण्याचा निर्णय घेणे, डॉक्टरांच्या आयएमआर संघटनेची कोरोना विषाणूच्या महामारी पासून बचावासाठी सहकार्य घेणे असे काही निर्णय झालेत. पण दवाखान्यातील अंतर्गत उपाययोजनेचे काय..? कोरोना कक्षातील दाखल रूग्णांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे झालेल्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर जे आरोप केले अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.

कोरोना कक्षात उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णांना ऑक्सीजन वेळेवर मिळत नसल्याच्याही तक्रारी आहे. अशा परिस्थितीत रुग्ण कसे वाचणार..?, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाजवळच थांबण्याची सक्ती करण्याचेही प्रकार झाले. कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांना किट घालण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्याचे प्रकरणे समोर आली, यावेळी नातेवाईकांना कोणतीही साधने पुरविली गेली नाहीत. अमळनेर येथील रवींद्र ओंकार बिऱ्हाडे या रुग्णास उपचार सुरू असताना ऑक्सिजन बंद ठेवण्याचा आरोप झाला. अमळनेर येथीलच कामगार नेते रामभाऊ संदानशिव, देविदास बिऱ्हाडे, रूपसिंग पारे आदींच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील प्रशासनच जबाबदार असल्याचे आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे काकडे यांच्याकडे‌तक्रार केली आहे.

८२ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात सापडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाला प्रकरण अंगाशी येण्याची जाणीव होताच यात कोणाचा तरी बळी जाणार हे निश्चितच होते. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ.कल्पना धनकवार यांना निलंबनाची शिक्षा देण्यात आली. मात्र रुग्णालयातील गलथानपणाला जबाबदार असणाऱ्या अनेकांना जाणीवपूर्वक बचावाची भिक्षा दिली गेली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूंची टक्केवारी भारतात सर्वात जास्त असल्याने प्रशासनही कोरोना नियंत्रित आणण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्यांनी आदेशावर आदेश देऊन आदेशांचे रेकॉर्ड केले आहे. त्यांचीही जिल्ह्यातून बदली होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना मृत्युदराची चौकशी होण्यासाठी विशेष तपास यंत्रणेची नियुक्ती झाल्यास रुग्णालय प्रशासन व जिल्हा प्रशासनातील गलथानपणास जबाबदार असणाऱ्या अनेकांचे चेहरे उघडे पडतील हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *