अधिष्ठातापदाचा पदभार डॉक्टर रामानंद यांच्याकडे;जळगावच्या कोविड रूग्णालयात १६ डॉक्टरांची नवीन फौज

जळगाव

जळगाव, दिनांक १२ जून

कोविड रुग्णालयांतील निष्काळजीपणामुळे कोरोना बाधित ८२ वर्षीय वृद्धा शौचालयात मृतावस्थेत आढळून आल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले. आज डॉ. जयप्रकाश रामानंद‌ यांच्याकडे धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह‌ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या दिमतीला १६ डॉक्टरांची नवीन फौज नियुक्त ‌ करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालयातील कोरोना कक्ष क्र. ७ मध्ये भुसावळ येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मालती नेहते यांचा शौचालयांमध्ये मृतदेह आढळून आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डाॅ.कल्पना धनकवार यांना निलंबित करण्यात आले आहे. आणखीही काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या व वाढती मृत्यूची टक्केवारी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जळगावचा अतिरिक्त पदभार ते सांभाळणार आहेत. यासोबतच १६ डॉक्टरांची नवीन टीम जळगावला नियुक्त करण्यात आली आहे. डॉ. अरुण हुमणे (चंद्रपूर ),डॉ. मधुकर गायकवाड (मुंबई ),डॉ. भारत चव्हाण (अहमदनगर), डॉ.व्यंकटेश जोशी (लातूर ),डॉ.श्याम तोष्णीवाल (लातूर),डॉ. उदय जोशी (आंबेजोगाई),डॉ. देवानंद पवार (आंबेजोगाई), डॉ. अतुल गारजे (लातूर), डॉ. मृदुल पाटील (लातूर),डॉ. रणजीत एस. (लातूर), डॉ. किरण माळी (लातूर), डॉ. प्रविण मोतेवार (आंबेजोगाई), डॉ. मोहित खरे (नागपूर) डॉ. शशांक मोडक (नागपूर) या १६ डॉक्टरांची जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *