राज्यात वाढलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन ; मुक्ताईनगरच्या कार्यकर्त्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

जळगाव

मुक्ताईनगर | प्रतिनिधी, दिनांक १७ जून

राज्यभरात सातत्याने घडत असलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात मुक्ताईनगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

देशात महाराष्ट्र राज्याची ओळख पुरोगामी विचारसरणीचे राज्य म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र राज्यात मागील काही महिन्यांपासून जाती अत्याचाराच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पिंपळधरा ता. नरखेड येथे अरविंद बनसोड ‌ यांची निर्घुण हत्या झाली. पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरुणावर जातिवाद्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली. महिंदळे ता.भडगाव जिल्हा जळगाव येथे यांच्या घरावर जातिवाद्यांना हल्ला करून घरातील महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. साळापुरी जिल्हा परभणी येथे १५ ते १६ जातीयवाद्यांनी ५ बौद्ध तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव तालुका कर्जत येथे साथिया मानसिकतेतून गाव गुंडांनी हल्ला केला. बीड जिल्ह्यात पारधी समाजाच्या तिघांचे हत्याकांड करण्यात आले. जालना जिल्ह्यातील चंदनापुरी खुर्द ता. अंबागड येथे २० ते २५ जणांच्या टोळक्याने जातीय मानसिकतेतून शिवीगाळ करत एका कुटुंबाला मारहाण केली. जालना जिल्ह्यातील मंठा येथील एका शिक्षकाला उच्चवर्णीयांकडून शिवीगाळ करत मारहाण झाल्याने कंटाळून त्याला आत्महत्या करावी लागली. परभणी जिल्ह्यात निळा तालुका सोनपेठ येथे बौद्ध कुटुंबांना कोरोना काळात शाळेत क्वारंटाईन केले म्हणून उच्चवर्णीयांनी बौद्ध समाजाच्या सरपंच व तिच्या पतीस मारहाण केली. वैजापुर तालुका औरंगाबाद येथील आंतरजातीय प्रेमप्रकरणातून कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात नागदरा ता. परळी येथे होलार समाजावर हल्ला करण्यात आला. या व अशा घटना सातत्याने राज्यात घडत असल्याने वंचित बहुजन आघाडी ने आज दिनांक 17 जून रोजी राज्यभरात ऑनलाइन आंदोलन केले. राज्यासाठी अत्याचाराच्या घटना जाणीवपूर्वक घडून आणण्यात येत असल्याचा संशय वंचित बहुजन आघाडी न व्यक्त केला असून पोलिसांकडून जातिवाद्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार होत असल्याकडे लक्ष देण्यात आले.

मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे सुमित बोदडे, कौस्तुभ शिंदे, सुनील खंडारे, प्रमोद जाधव, रवींद्र चव्हाण, भागवत चव्हाण रवींद्र सैमिरे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांचेकडे निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *