जळगावांतील कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची माहिती दोन आठवड्यात सादर करा; सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या याचिकेवर राज्य शासनाला उच्च न्यायालयाची नोटीस

जळगाव

जळगाव,दिनांक १९ जून

जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना ग्रस्तांच्या उपचारात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्या प्रकरणी राज्य शासनाने दोन आठवड्यात माहिती सादर करावी असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे व अन्य दोन जणांनी उच्च न्यायालयात १ जून रोजी याचिका दाखल केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा दाखविला जात असून रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप याचिकेद्वारे केला आहे. कोविड रुग्णांच्या उपचारातील उणीवा, दुर्लक्ष आणि गैरव्यवहार याकडे याचिकाकर्ते प्रतिभाताई शिंदे व अन्य दोघांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. डॉ. भास्कर खैरे अधिष्ठाता असताना दिनांक २ जून रोजी सामान्य रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक सातच्या शौचालयात आढळून आला होता. याकडे लक्ष वेधत सिविल हॉस्पिटल मधील वरिष्ठ डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तसेच छळासाठी आणि जीवितहानी साठी मयत वृद्ध महिलेच्या कुटुंबांना ५० लाख रुपये भरपाईची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रुग्णालयात पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, कोरोनाच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आरोग्य प्रशासनाकडून कर्तव्य पालनातील हलगर्जीपणा, झालेला गैरव्यवहार याची उच्चस्तरावर चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषी आढळणाऱ्या विरुद्ध खटले दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह व त्यांचे सहकारी वकील अंकित कुलकर्णी हे काम पाहत आहेत.

याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य शासनाकडे दोन आठवड्यात खुलासा मागितला आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *