जळगाव महापालिकेत टेंडर घोटाळा; तयार पुलासाठी काढली निविदा

जळगाव

आमदार निधीसाठी नितीमत्ता सरेंडर; जळगाव मनपाचा कारभार वंडर

राष्ट्रवादी अर्बनसेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी ‌‌‌देशमुख यांचा आमदारांसह मनपा प्रशासन व ठेकेदारांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे

लक्ष्मीनारायण नगर ते श्रीराम नगर ला जोडणाऱ्या या पूर्वीपासून तयार असलेल्या पुलासाठी निविदा प्रकाशित करून आमदार निधी फस्त करण्याचा प्रयत्न होत आहे.

जळगाव, दिनांक २५ जून

पूर्वीपासून तयार असलेल्या पुलासाठी टेंडर काढून आमदार निधी फस्त करण्याचा प्रयत्न अमर अकबर अँथनी गॅंग करीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार सुरेश दामु भोळे‌ (राजू मामा) मनपातील सत्ताधारी, प्रशासन व ठेकेदार या अमर अकबर अँथनी गॅंगची युती झाली असुन  पूर्वीपासून तयार असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी वीस लाख रुपयांचे टेंडर काढून आमदार निधी हडप करण्यासाठी सर्वजण एकत्र आले असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलचे समन्वयक मुविकोराज कोल्हे यांनी  दिनांक बुधवार दिनांक २४ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन आधीच बांधकाम झालेल्या पुलाच्या कामाची बेकायदेशीर निविदा काढून शासनाने मंजूर केलेल्या आमदार निधीत षडयंत्र रचून भ्रष्टाचार केला जात असल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाचे पुरावेच पत्रकार परिषदेत माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांनी सादर केल्याने महानगरपालिकेत विकास कामाच्या नावाखाली टेंडर काढून वेगवेगळ्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचारासाठी आमदार निधीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आमदारांचा या भ्रष्टाचाऱ्यांना खुला पाठिंबा असल्याची मनपा वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.

जळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये लक्ष्मीनारायण नगर श्रीराम नगर यांना जोडणारा पूल पूर्वीपासून तयार आहे. या पुलाचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटोकॉपी काढून यात कामाची नवीन निविदा काढली गेल्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे अश्विनी देशमुख यांनी ई-मेल द्वारे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेल्याने भ्रष्ट प्रवृत्तींना उच्चस्तरीय पाठबळ मिळत असल्याचे समोर आले. वास्तविक पुरूना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू  करण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे शासनाची आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने कोणतीही नवीन कामे करण्यात येऊ नये, तसेच या कामांची निविदा काढण्यात आली आहे त्या रद्द करून, वर्कऑर्डर रद्द करण्यात यावेत असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांना दिले असताना जळगाव शहर महानगरपालिकेने या निर्देशांकडे कानाडोळा करत आमदार निधी  गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पूर्वीपासूनच तयार असलेल्या मुलाचे इस्टिमेट वार्डातील इंजिनीयरला हाताशी धरून तयार करण्यात आले आहे. आमदारांनीही तत्परता दाखवत स्वतःच्या आमदार फंडातील निधी मंजुरीचे पत्र दिले. शहर अभियंत्यांनीही कोणतीही शहानिशा न करता, स्थळ निरीक्षण न करता इस्टिमेटला मंजुरी देऊन टाकली. आयुक्त, उपायुक्त यांनी सुद्धा कोणतीच खात्री न करता इस्टिमेटला मान्यता दिली. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी निविदा प्रकाशित केली. या कामासाठी तिन ठरवून निविदा आल्या व सर्वात कमी दराची निविदा आमदारांच्या निकटवर्तीय विश्वासू ठेकेदाराची आली. ही बाब शंकास्पद स्वरूपाचीच आहे. हा सर्व प्रकार अत्यंत नियोजन पद्धतीने झाला असून कोणालाही शंका येऊ नये म्हणून दोन निविदा जाणीवपूर्वक जास्त दराची टाकण्यात आली. निविदा प्राप्त होताच त्या उघडण्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. असा स्पष्ट आरोप अश्विनी देशमुख यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात शहर अभियंता सुनील भोळे, आयुक्त सतीष कुलकर्णी, शाखा अभियंता विजय मराठे, टेंडर लिपिक कैलास चौधरी यांच्यासह  मनपा प्रशासनातील सर्व संबंधित, ठेकेदार डी.एच.पाटील कंट्रक्शन व आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) या सर्वांचा सहभाग दिसून येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

यापूर्वी देखील महानगरपालिका तसेच प्रकार झाले आहेत. सार्वजनिक स्वच्छता अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या काही शौचालयांच्या कामांची दुरुस्तीच्या नावाने पुन्हा निविदा काढण्याचे प्रकार घडले आहेत. आधीच घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव शहर महानगरपालिका संपूर्ण देशभरात बदनामीच्या गर्तेत अडकली आहे. त्यातून कोणताही बोध न घेता छोट्या मोठ्या कामांमध्ये निधीचा फडशा पाडून मोठी डकार देण्याचे प्रकार सुरूच असल्याने या सर्व प्रकारांची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे आवश्यक आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *