वर्दीतही माणुसकीचा पाझरतोय झरा..रावेरचा पोलीस दादा हिरो ठरलाय खरा..!

जळगाव

तीनचाकी सायकल वरून महाराष्ट्र ते झारखंड निघालेल्या कुटुंबाला मदतीचा हात ; पोलीस कर्मचारी निलेश लोहार ठरले सामाजिक सेवेतला सिंघम

 

 

रावेर | नजमोद्दिन शेख, दिनांक २८ जून

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोनाने आपल्या देशातही थैमान माजवले आहे. कोरूना चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. पोटापाण्याची भूक शमवण्यासाठी महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या अनेक परप्रांतीय मजूर कुटुंबांनी मिळेल त्या साधनांनी आपल्या राज्याची वाट धरली. कोणी ट्रकने तर कोणी रिक्षाने.., कोणी कारने तर कोणी पायीच निघाले.. ही अत्यंत भयावह.. विदारक.. आणि अंगावर शहारे आणणारी वेदनादायक परिस्थिती होती..! आता स्थलांतरित मजुरांचे लोंढे ‌ थांबले असले तरी अधूनमधून एखादे दुसरे मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात जाणारे कुटुंबीय नजरेस पडतात. अशाच एका असहाय.. अपंग व्यक्तीचा आपल्या कुटुंबासह सुरू झालेला सुन्न करणाऱ्या प्रवासाची वास्तव कहाणी आहे.. या कहाणीचे जिवंत पात्र झारखंडचे कुटुंबीय असले तरी या कहाणीतला खराखुरा नायक ठरला आहे रावेर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार..!

मूळ झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील डोरांडा या छोट्याशा गावातील कृष्णा यादव अपंग ४० वर्षीय युवक पत्नी सुनीता देवी व मुलगा अजयप्रसाद यांच्यासोबत नवी मुंबई येथे रोजगाराच्या शोधात आला होता. सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबईने या कुटुंबालाही सामावून घेतले. या कुटुंबाची आयुष्याची घडी नीटनेटकी बसत असतानाच अचानक जगभरात कोरोना व्हायरसचा उच्छाद सुरू झाला. भारतातही कोरोनाविषाणूने पक्के बस्तान बसविल्याने त्यापासून नागरिकांचा बचाव करण्याच्या इराद्याने केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन घोषित केले. अचानक लाॅकडाऊन घोषित झाल्यामुळे रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय मजुरांनी आपल्या कुटुंबियांसह आपापल्या राज्यात परतीचा प्रवास मिळेल त्या साधनांनी सुरू केला. अशाच कुटुंबांपैकी कृष्णा यादव यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्या झारखंड येथील मूळ गावी जाण्यासाठी निघाले. हातात कोणतेही पैसे नाहीत. जेवणाचीही वणवणच.. पत्नी सुनीता देवी व चार वर्षाचा निरागस मुलगा अजयप्रसाद दीड महिन्यांपूर्वी तीन चाकी सायकल वरून नवी मुंबईहून निघाले.., मजल दर मजल करीत कसेतरी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे पोहोचले. रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस जवळ कृष्णा यादवची पत्नी तीनचाकी सायकल लोटत असताना श्रीराम आॅटो सेंटरमधील कर्मचारी प्रवीण याच्या नजरेस पडले. या कुटुंबाची माहिती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांनाही समजली. त्यांनी या कुटुंबाला मदतीसाठी हात सरसावला. मदत करणारे निलेश लोहार हे आहे पोलीस आहेत हे समजताच कृष्णा यादव याने अविश्वास दाखवून मदत नाकारली. त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी कृष्णा यादव यास बोलके केल्यानंतर त्याने सांगितलेले अनुभव निश्चितच अंगावर शहारे आणणारे असेच होते.

दीड महिन्यापूर्वी कृष्णा यादव पत्नी व मुलासह नवी मुंबईहून झारखंडला जाण्यासाठी निघाल्यानंतर ठाणे जवळील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना थांबवून मदत करण्याचे सांगत एका शाळेत तब्बल १४ दिवस क्वारंटाईन केले. याठिकाणी जेवणाची गैरसोय तर होतीच पण प्रचंड हाल झाल्याचे कृष्णा यादव सांगत असताना त्याच्या डोळ्यातल्या भावना खूप कल सांगून गेल्या. वर्तक नगर च्या पोलीसांनी क्वारंटाईन केले नसते तर केव्हाच झारखंडला पोहचता आले असते अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. आणि याच कारणाने  पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांनी केलेला मदतीचा हात भीतीपोटी कृष्णा यादवने नाकारला. रोज थोड्या थोड्या अंतराने सायकल चालवायची, पत्नी सुनीता देवी सायकल लोटायची., संध्याकाळची किती झाली तिथल्या जवळच्या गावात रात्री मुक्काम राहायचे असा नित्यक्रम सुरू झाला. मजल दर मजल करत कृष्णा यादव त्याच्या पत्नी व मुलासह तीन चाकी सायकल चालवत रावेर येथे येऊन पोहोचले. प्रवासाच्या सुरुवातीलाच पोलिसांकडून मिळालेल्या अनुभवाने कृष्णा व त्याची पत्नी दुखावली होती.अखेर निलेश लोहार यांच्या मनातील सच्चे भाव, देहबोलीतील प्रामाणिकपणा, तळमळ पाहून कृष्णा यादव व त्याची पत्नी मदत घ्यायला तयार झाले. पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांनी रावेरला त्यांच्या जेवणाची मुक्कामी राहण्याची सोय केली. झारखंड जाण्यासाठी तीन चाकी सायकलचा प्रवास सोयीचा  नाही लक्षात घेऊन निलेश लोहार यांनी कृष्णा यादव यांना थोड्या पैशांची मदत करून सावदा येथील पेट्रोल पंप चालक बाबुशेठ, निळू चौधरी, वाघोद्याचे प्रवीण महाजन अलिविरा येथील ट्रक चालक सतीश यांच्या सहकार्यातून केळीच्या ट्रक मधून कृष्णा यादव त्याची पत्नी सुनीता देवी व मुलगा अजय प्रताप यांना झारखंड जाण्यासाठी रवाना केले. निलेश लोहार यांनी केलेल्या मदतीबद्दल कृष्णा यादव व त्यांच्या पत्नीने त्यांना मनापासून धन्यवाद देत पोलिसांबद्दल असलेला अविश्वास चुकीचा होता असे सांगून तुम्ही खरेच आमच्यासाठी देव माणूस आहात असे कृतज्ञतापूर्वक  उद्गार काढले.

निलेश लोहार यांनी सातत्याने लाॅकडाऊनच्या आतापर्यंतच्या काळात स्थलांतरित झालेल्या परप्रांतीय व राज्यातील विदर्भाकडे जाणाऱ्या मजुरांसाठी सामाजिक बांधिलकीतून स्वतःला अक्षरशः झोकून देत खाकी वर्दीतही माणुसकीचा झरा खळाळून वाहत असल्याचे दाखवून दिले आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रावेर येथे अन्नछत्र सुरू करण्यासाठी निलेश लोहार यांनी पुढाकार घेतला होता. फळे, बिस्किटे, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय, अनवाणी असलेल्या मजुरांना चप्पल आदी प्रकारचे सामाजिक भान जोपासत निलेश लोहार यांनी केलेले सेवाकार्य सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले. पोलीस निव्वळ कायदा व सुव्यवस्थेचे सिंघम नसतात तर ते सामाजिक कार्यातही सिंघम असतात याचा प्रत्यय पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या सेवावृत्तीतून दिसून आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *