भाजपा आमदार महेश लांडगे कोरोना पॉझिटिव्ह; खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

राज्य

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात  लावली होती हजेरी ; संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार

 

पुणे, दिनांक २९ जून

 

कोरोना विषाणूचा विळखा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बसला असून अनेक सेलिब्रिटीज सह राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत असल्याने जनतेच्या मनात कोरोना व्हायरसची प्रचंड दहशत बसली आहे. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण व धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर तिघेही मंत्री बरे झाले आहेत. आता पुन्हा एका राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.आज पहाटेच्या सुमारास ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आमदार महेश लांडगे देखील तिथे उपस्थित होते.शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते.

काल दिनांक २८ जून रोजी (रविवारी) आमदार महेश लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल वाटल्याने त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता.

आमदार महेश लांडगे यांचा कोरूना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *