तलाठी रजेवर..जनता वाऱ्यावर

जळगाव

 पिंप्राळा  तलाठ्याची रजा अन् बंद केला सजा

कार्यालय बंद असल्याची नोटीस चिटकवली

पिंप्राळा तलाठी वैद्यकीय कारणाने रजेवर असल्याने कार्यालय बंद असल्याची शटरवर चिटकवण्यात आलेली नोटीस

जळगाव, दिनांक २९ जून

आजारपण कधी कोणाला येईल हे सांगता येत नाही. सरकारी कर्मचारी आजारी पडला तर त्याची जबाबदारी सांभाळायला दुसरा कर्मचारी असतोच. पण एखादा सरकारी कर्मचारी आजारी पडला तर कार्यालयात बंद होत असेल तर…, होय..! जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील तलाठी एका दिवसाच्या वैद्यकीय रजेवर गेल्याने तलाठी कार्यालयाचे बंद ठेवले गेले. तलाठ्यांची एका दिवसाची रजा असली तरी तलाठी सजा बंद ठेवले गेल्याने कोतवाल व इतर यांनाही न मागताच सुट्टी मिळाली.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध कामांसाठी त्यांच्या मिळकत पत्रिकेचे उतारे व जमीन महसुलाच्या तसेच गाव दप्तरांचे अभिलेखा साठी तलाठी कार्यालय यावे लागते. तलाठी हे महसूल विभागातील थेट नागरिकांशी संबंध येणारे महत्वाचे पद आहे. तलाठ्यांच्या मदतीला कोतवालाची नियुक्ती केली जाते. तलाठ्यांच्या अनुपस्थित नागरिकांसोबत समन्वय साधण्याचे काम कोतवाल करतात. मात्र, पिंप्राळा परिसरातील “तलाठी आप्पा” आजारी पडल्याने त्यांनी सोमवार दिनांक २९ जून रोजी वैद्यकीय कारणासाठी सुट्टी घेतली. पण त्यांच्या एक दिवसीय रजेमुळे तलाठी सजा (कार्यालय) चक्क बंद ठेवण्यात आले. कार्यालय बंद असल्याची नोटीस देखील कार्यालयाच्या शटरवर चिटकवण्यात आली. तलाठी कार्यालय बंद ठेवण्यासाठी वरिष्ठांची परवानगी होती किंवा कसे हा प्रश्न नागरिकांना पडून उपयोग नव्हता.  तलाठी कार्यालय “तलाठी आप्पां”च्या एक दिवसीय आजारपणामुळे बंद असल्याने विविध कामांसाठी आलेल्या अनेक नागरिकांना कार्यालयावर मिटवण्यात आलेली नोटीस वाचून आल्या पावली पर फिरावे लागले. उद्या एखाद्या शाळेचा हेडमास्तर आजारी पडला तर अख्खी शाळाच बंद ठेवली जाईल असे अनेक नागरिक गमतीने म्हणत होते.

सध्या कोरोना विषाणूंमुळे जळगाव शहरासह जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एखाद्या व्यक्तीला किरकोळ स्वरूपाचा आजार असला तरी उपचारासाठी दवाखाने बंद असल्याची परिस्थिती दिसते. आता पिंप्राळा तलाठ्यांना नेमका कोणता एक दिवसीय आजार झाला हा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा प्रश्न आहे. पण त्यांच्या आजारपणामुळे तलाठी कार्यालय बंद ठेवले जात असेल तर.. “तलाठी रजेवर.. जनता वाऱ्यावर..” असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *