ट्रॅक्टर मोटरसायकलचा अपघात; महिला जागीच ठार

विदर्भ

– फरार ट्रॅक्टर ड्रायव्हरला सिनेस्टाईल पाठलाग करून किशोर कांबळेनी पकडले          •वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह

पुसद| राजेश ढोले

येथून जवळच असलेल्या गायमुख नगर येथील मुलगा व आई पुसद येथील मनीष पाठक यांच्या दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परत जात असताना पंचायत समिती समोर खताने भरगच्च भरलेल्या ट्रॅक्टर टेलरने मोटार सायकलला धडक दिल्याने गाडीवर मागे बसलेल्या महिलेचा ट्रॅक्टर ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक ३जुलै रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडली आहे.

वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोर यशोदा नामदेव चव्हाण (वय ६५ वर्षे) राहणार गायमुख नगर असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या माहितीवरून यशोदाबाई यांची प्रकृती बरी नसल्याने ते व त्यांचा मुलगा रविराज नामदेव चव्हाण (वय ४० वर्षे) हे त्यांच्या दुचाकीने गायमुख नगर येथून उपचार घेण्यासाठी शहरातील डॉ. पाठक यांच्या दवाखान्यामध्ये दुपारी १२ ते १ वाजे दरम्यान आले होते. उपचार घेऊन यशोदाबाई व त्यांचा मुलगा दुचाकीवर गायमुख नगर कडे जात असताना शिवाजी चौकातून दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयासमोर मागून विना नंबरचे खताने भरलेले ट्रॅक्टर ट्रेलर चालक शाम तारासिंग राठोड रा. रुई गोष्ता ता. दिग्रसकडे जात असताना त्यांच्या ट्रॅक्टर टेलरने रविराज चव्हाण यांच्या मोटर्स सायकलला धडक दिल्याने रविराज चव्हाण यांच्या दुचाकीचे संतुलन बिघडले आणि मागच्या सीटवर बसलेल्या यशोदाबाई नामदेव चव्हाण यांचा ट्रॅक्टर ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात होतात ड्रायव्हर ट्रॅक्टरट्रेलर घेऊन प्रसार झाला होता. परंतु ट्रॅक्टर चालकाला पकडण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला .

ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर न थांबविता किशोरदादा कांबळे यांच्या दुचाकीवर ट्रॅक्टर घातल्याने त्यांच्या दुचाकी खाली पडली तरीही कांबळे यांनी जिवाची पर्वा नकरता ट्रॅक्‍टर चालकाला पकडून वसंतनगर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. विशेष बाब म्हणजे शिवाजी चौकात वाहतूक पोलिस शिपाई नेहमी कर्तव्य बजावीत असतात त्यांच्या डोळ्या समोरून साधा दुचाकीस्वार सुद्धा किंवा मास्क न वापरणारा नागरिक सुद्धा सुटत नाही. मग हा क्षमतेपेक्षा जास्त खत वाहून नेणारा व बिना नंबरचा ट्रॅक्टर ट्रेलर आणि विनापरवाना ट्रॅक्टर चालविणारा ड्रायव्हर तसेच ट्रॅक्टरवर दहा ते पंधरा लोक बसून जात असताना कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस शिपायाने कारवाई का केली नाही. असा सवाल निर्माण झाला आहे.

जर या ट्रॅक्टर ट्रेलरवर वाहतूक पोलीस शिपायांनी कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असा आरोप सर्वसामान्य जनतेतून पोलीस प्रशासनावर केल्या जात आहे.

या घटनेची तक्रार वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये रविराज नामदेव चव्हाण यांनी दाखल केली असून ट्रॅक्टर चालक शाम तारासिंग राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास वसंतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *