लॉकडाऊन हा जनतेच्या स्वंयशिस्तीतून जनता कर्फ्यू व्हावा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा

जळगाव

• उद्यापासून सात दिवस जळगाव, अमळनेर व भुसावळ शहरात कडकडीत बंद

– पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव, दिनांक ६ जुलै

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिका, अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात उद्या मंगळवार दिनांक ७ जुलै ते १३ जुलै दरम्यान लागू करण्यात आलेला ‘लॉकडाऊन’ हा नागरीकांच्या स्वयंशिस्तीतून ‘जनता कर्फ्यु’ व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, जे नागरीक लॉकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  जिल्हाधिकारी श्री.राऊत बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश हा कोरोना कॅरिअरपासून होणारा प्रादुर्भाव रोखला जावा हा आहे. या कालावधीत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, कृषि उद्योगाची दुकाने, एमआयडीसीतील उद्योग, वृत्तपत्रांची कार्यालये सुरु राहणार असून पूर्व नियोजित लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या मर्यादेत तर अंत्यविधीचे कार्यक्रम २० व्यक्तींच्या मर्यादेत करता येणार आहे. त्याचबरोबर दुध वाटप व औषधी दुकाने दिवसभर सुरु राहणार आहे. नागरीकांना आपल्या प्रभागात पायी जावून दुध व औषधे खरेदी करता येणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होणार आहे. पेट्रोल पंपचालकांनी इतरांना पेट्रोलचे वाटप करु नये अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

औषधे दिल्यानंतर प्रिस्क्रीप्शनवर दिल्याची तारीख व वेळ टाकणे बंधनकारक अनेक नागरीक औषधे घेण्याच्या कारणाने वारंवार बाहेर फिरत असतात, त्यामुळे या कालावधीत मेडिकल दुकानदारांनी ग्राहकाला औषधे दिल्यानंतर त्या प्रिस्क्रीप्शनवर औषधे दिल्याची तारीख व वेळ टाकणे मेडिकल दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास त्या दुकानदारांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात जळगाव, अमळनेर व भुसावळ या शहरांमध्ये प्रभागनिहाय बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरीकांना काही अडचण आल्यास त्यांनी पोलीस कंट्रोल रुमला कळविल्यास त्यांच्या अडचणीचे निवारण करण्यात येईल. लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदोबस्त असणार आहे. यासाठी या शहरांमध्ये १२०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी असणार आहे. तर भुसावळ शहरात एसआरपीची एक तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. बेशिस्त वागणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या शहरात ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर करण्यात येणार आहे. तसेच या शहरातील रस्त्यांवरही सिलींग पॉईट उभारण्यात येणार आहे. लॉकडाऊन हा नागरीकांच्या सुरक्षिततेसाठीच असल्याने नागरीकांनी स्वयंशिस्त पाळावी. असे आवाहन करतानाच जे नागरीक वारंवार बाहेर फिरतांना दिसतील त्यांचेवर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करतांना त्यांचे वाहन जप्त करण्याचा इशाराही पोलीस अधीक्षक डॉ.उगले यांनी दिला आहे.
लॉकडाउन काळात जळगाव शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात तीन व्यक्तींच्या ११७ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या व्यक्ती घरोघरी जाऊन नागरीकांचे थर्मल स्कॅनर, पल्सॲक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केलेल्या नागरीकांची माहिती मोबाईल ॲपवर साठविण्यात येणार असून आवश्यकता भासणाऱ्या नागरीकांची स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅनमार्फत घरोघरी जाऊन स्वॅॅब घेण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांचेवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील दिव्यांग नागरीकांना काही अडचण असल्यास त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कृषि उत्पादने विक्रीसाठी कुठलेही बंधने नसून शेतमाल व फळांची वितरण व्यवस्था कृषि विभाग तसेच शेतकरी गटांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *