चिंचवड येथील ईएसआय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचे हाल ; रुग्णांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात भांडार विभाग प्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष

पुणे
  • रूग्णांना साहित्य किट देण्यात भेदभाव,जेवणाच्या दर्जाबाबत रुग्णांचा संताप


पुणे, दिनांक १३ जुलै 
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात विळखा बसला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना बाधितांची रुग्णसंख्या चिंताजनक आहे. कोविड रुग्णांवर महापालिका रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मात्र कोरोना रुग्णांना साहित्य कीट देण्यात भेदभाव केला जात असल्याची पिंपरी-चिंचवड येथील परिस्थिती आहे.
चिंचवड,  मोहन नगर परिसरातील ईएसआय रुग्णालयात कोरोना रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात मोहन नगर येथे ईएसआय दवाखान्यात कोरोना वर उपचार घेत असलेल्या नामांकित वकील महिलेने दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे, या वकील महिलेस कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र त्यांना अॅडमिट करून घेण्यास मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयाने कमालीची दिरंगाई दाखवली. तब्बल तीन तासांनंतर या वकील महिलेस रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या महिलेने ब्रश, साबण, बकेट, ग्लास, टॉवेल व सॅनिटायझर या सुरक्षा किटची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली. परंतु या वकील महिलेला साहित्य किट दिले गेले नाही. विशेष म्हणजे त्यांच्या आधी दाखल झालेल्या काहींना किट घेण्यात आले व नंतर दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना किट दिले गेले. या वकील महिलेचा डिस्चार्ज दोन दिवसांवर आला असतानाही साहित्य किट दिले गेले नसल्याने रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा व व साहित्य किट वाटपातील भेदभाव उघड झाला आहे.
कोरोना रुग्णांना साहित्य कीट पुरविण्याची जबाबदारी असलेले भांडार विभाग प्रमुख तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हलगर्जीपणामुळे कोविड रुग्णांना किट देण्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येऊन भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे. पवार यांचे कामात लक्ष नसून ते फोनही उचलत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भांडार विभागातील सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्या म्हणण्यानुसार,ईएसआय रुग्णालयाला पुरेशा किट महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असतानाही रुग्णांना साहित्य पुरवले जात नसल्याने काहीतरी मोठा घोळ असल्याचा संशय आहे.
ईएसआय रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट स्वरूपाचा असून जेवणामध्ये अळ्या, माशा आढळण्याचे गंभीर प्रकारही समोर आले. रुग्णांना सकस व दर्जेदार जेवण पुरविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने त्यात सुधारणा करून सक्षम करावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *