भारतात कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात

राष्ट्रीय


३० वर्षीय व्यक्तीला देण्यात आला भारतातील कोरोना लसीचा पहिला डोस


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २४ जुलै

संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूवर औषध शोधण्याचे जगभरात प्रयत्न सुरू असतांना भारतात विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली असून पहिला डोस ३०  वर्षीय व्यक्तीला देण्यात आला आहे.लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेल्या  स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यानंतर या व्यक्तीवर पुढील सात दिवस लक्ष ठेवले जाणार आहे.  भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी बनावटीची  कोवॅक्सिंन ही कोरोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीकडून  कोवॅक्सिंन ही लस तयार करण्यात आली आहे.यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.

कोवॅक्सिंन या लसीचा पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जणांचा समावेश आहे. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.कोवॅक्सिंनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स  हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, कोवॅक्सिंन लसीच्या परिणामांकडेे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *