शासकीय इमारतीवर चढून कारागृहात वस्तू फेकणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव

• दोन युवक पळून जाण्यात यशस्वी, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलजळगाव दिनांक २८ जुलै

जिल्हा कारागृहाची सुरक्षा धोक्यात आल्याची आणखी एक घटना दुपारच्या सुमारास घडली. कारागृहाला लागून असलेल्या शासकीय निवासस्थानावर चढून कारागृहात वस्तू फेकून पलायन करणाऱ्या एका तरुणाला शिताफीने अटक करण्यात आली मात्र दोघे तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कारागृह लगत असलेल्या शासकीय निवासस्थानावर तरुणाचा आवाज कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीवर असलेल्या सर्कल अंमलदार अमितकुमार रोहिदास पाडवी यांना आला. हा तरुण कारागृहात पिशवी फेकण्याच्या तयारीत आहे हे लक्षात येताच पाडवी यांनी तुरुंगातील अधिकारी किरण पवार, गेट कीपर कुलदीप दराडे व रक्षक विक्रम हिवरकर यांच्या निदर्शनास आणून तातडीने धाव घेतली. यावेळी धान्य गोदामाकडे पळून जात असताना सोनू रमेश राठोड (वय-२०) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला पाठलाग करून पकडण्यात आले. या तरुणांसोबत असलेले साई ऊर्फ उमेश आटे व अविनाश शिंदे हे दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.नव्यानेच रूजू झालेले कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहात टेकण्यासाठी आणलेल्या पिशवीत साबण, ब्रश, शर्ट, बिडी बंडल व इतर साहित्य होते. कारागृहातील बंदी असलेल्या दिनकर रोहिदास चव्हाण रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव या याच्यासाठी हे साहित्य आणण्यात आले होते.
दुपारी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल,सपोनी सचिन जाधव, महेंद्र बागुल यांनी कारागृहात जाऊन परिसराची पाहणी केली. या घटनेत फरार असलेल्या दोघांचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.
नुकतीच कारागृहात बंदिवान बडतर्फ पोलिस कर्मचारी व दोन बंदिवान कैद्यांनी पिस्तुलचा वापर करून कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा कारागृहातच्या लगत असलेल्या शासकीय निवासस्थानावरून वस्तू फेकण्याचा प्रकार घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *