शासकीय धान्य तुटीच्या अपहारातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अन्यथा आंदोलन

जळगाव

• जनसंग्रामचा इशाराभुसावळ, दिनांक २९ जुलै

तालुक्यातील शासकीय गोदामात रेशनिंग धान्याचा साठा कमी आढळून आल्याने या अपहारप्रकरणी ७ लाख २७ हजार २४४ रुपये रक्कम तत्कालीन प्रांत श्रीकुमार चिंचकर यांच्यासह सहा अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत समप्रमाणात भरणा करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जारी केले होते.त्यानुसार पाच अधिकाऱ्यांनी रक्कम भरली आहे.

या धान्यसाठ्याच्या अफरातफर प्रकरणात सहभागी सर्व अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात यावे अन्यथा नाशिक विभागीय आयुक्त यांना घेराव घालण्यात येईल,असा ईशारा जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला आहे.

याबाबत असे की,एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भुसावळातील शासकीय गोदाम क्रमांक १,२ व ३ मधील रेशनिंग मालाच्या धान्याचा साठा तपासणीचे काम नागरी पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप केदार व त्यांच्या पथकाने केले होते यात गहू,ज्वारी व साखर धान्याच्या साठ्यात ३९१.९२ क्विंटल तफावत दिसून आल्याचा अहवाल त्यांनी दिला होता.याकाळातील भुसावळ येथील तत्कालीन गोदाम व्यवस्थापक आर.एल.राठोड (हल्ली निवासी नायब तहसीलदार त्रंबकेश्वर जि. नाशिक),तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे (हल्ली तहसीलदार जामखेड जि.नगर),तत्कालीन प्रभारी तहसीलदार एस.यु.तायडे (हल्ली
निवासी नायब तहसीलदार रावेर),तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात (हल्ली तहसीलदार नंदुरबार),रविंद्र जोगी तहसीलदार बोदवड, जि.जळगाव आणि तत्कालीन भुसावळ प्रांत श्रीकुमार चिंचकर (हल्ली भूसंपादन अधिकारी,धुळे) अशा सहा जणांवर समप्रमाणात अपहाराचा ठपका ठेवून यांनी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या ३१ डिसेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षात अपहार झाल्याच्या दिनांकापासून वसुली करण्याच्या दिनांकापर्यंत केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या Economic Cost प्रमाणे वसुलीच्या रकमेवर राष्ट्रीयकृत बँकेच्या व्याजाच्या दराप्रमाणे तुटीची एकूण वसुलीची रक्कम भरावी असे आदेश केले होते.शासकीय गोदमाच्या धान्य तुटीच्या प्रकरणात तत्कालीन प्रांत श्रीकुमार चिंचकर
वगळता सर्वांनी गेल्या जून महिन्यात प्रत्येकी १ लाख २१ हजार २१८ रुपयांचा भरणा केलेला आहे.श्री.चिंचकर यांनी मागणी केल्यावरून त्यांना अपहार रकमेचा भरणा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यात शासकीय गोदामातील धान्यसाठ्यातील तफावत अनियमितता नसून
दंडाची रक्कम भरणे म्हणजेच
आपोआपच अपहार केल्याचे कबूल झाल्याने यांना अभय न देता या सर्वांवर शासकीय धान्याची अफरातफर केली म्हणून यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई व्हावी अशी मागणी श्री.ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना इमेलवरून केलेल्या तक्रारीत केली आहे.

भुसावळसह जळगाव जिल्ह्यात अनेकवेळा शासकीय धान्यसाठा असलेल्या रेशनिंग मालाच्या गोदामावर छापे टाकून तपासणी झालेली आहे.यात गुन्हे दाखल होऊन सुद्धा काहीही निष्पन्न झाल्याचे दिसून आले नाही. तथापि थेट मुंबईहुन अन्न नागरी पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालकांचे पथक कारवाई करते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना धान्यातील तुटीच्या अफराच्या रकमेची वसुली केल्यावाचून पर्यायच नव्हता.म्हणून या सहा अधिकाऱ्यांनी एकप्रकारे आपल्या नियमित कामात कसूर केल्याचे एकप्रकारे मान्य करून धान्य तुटीची अपहार रक्कम भरली आहे.आपण केलेल्या चुकीची कबुली देत शासकीय धान्याच्या अपहाराच्या रकमेचा भरणा करणाऱ्या व याप्रकरणात गरिबांच्या ताटातील घास हिसकावून त्यांच्या हक्काच्या धान्यात अफरातफर करणाऱ्या दोषी ठरवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व सहाही अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अचानक केव्हाही पदाधिकारी व कार्यकर्ते विभागीय आयुक्त यांच्या कार्यलयावर धडक देऊन घेराव आंदोलन करतील असा ईशारा जनसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *