निष्काळजी मनपा प्रशासनाला कोरोनाचे गांभीर्य कळणार कधी..?

जळगाव

• कोविड-१९ च्या विशेष कामाचे साफसफाई कामगार पुरवठा निविदा उघडण्यास जळगाव शहर महापालिकेला मुहूर्त मिळेना


• महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवक नवनाथ दारकुंडेे यांचा संतप्त सवाल


जळगाव दिनांक ३१ जुलै

“ जळगाव शहरात चहूबाजूने विस्तार केलेल्या कोरोनाविषाणूवर मात करण्यासाठी एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाला याचे अजिबात गांभीर्य वाटत नाही.कोविड-१९ च्या विशेष कामासाठी ४५० साफसफाई कामगारांची निविदा महापालिका प्रशासनाकडून ११ जुलै रोजी काढण्यात आली. या कामासाठी दिनांक २२ जुलै अखेर फक्त दोनच निविदा आल्याने महापालिका प्रशासनाने निविदा भरण्यास २७ जुलै पर्यंत मुदत वाढ दिली. मात्र ३० जुलै उलटल्यानंतरही अद्यापपर्यंत निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. या निविदा कामांसाठी महापालिका प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती मधील एक सदस्य आजारी असल्याने निविदा उघडण्यात विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अत्यंत हास्यास्पद असून महापालिका प्रशासनाला कोरोना संसर्गाचे कोणतेच गांभीर्य नसल्याचा आरोप भाजपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.”


संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतात जलद गतीने फैलाव झाल्याने जगात सर्वाधिक रुग्ण संख्येत अमेरिका, ब्राझील नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून जळगाव जिल्ह्यातही कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाचे लक्ष जळगावकडे वेधले गेले. जळगाव जिल्ह्याने कोरोना संसर्ग बाधित १० हजार रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक करुणा बाधित रुग्णांची संख्या जळगाव शहरात असून गुरुवार दिनांक ३० जुलै अखेर २७७८ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील आहेत. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून कोविड-१९ च्या विशेष कामासाठी ४५० सफाई कामगारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या कामासाठी फक्त दोनच निविदा आल्याने महापालिकेने २७ जुलै पर्यंत निविदा भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. हे मुदतही निघून गेली आहे. परंतु अद्यापपर्यंत निविदा उघडण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे कोरोनाविषाणू चा कहर शहरात सुरू असूनही महापालिका प्रशासनाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. कोविड १९ च्या विशेष कामाकरिता सफाई कामगारांच्या पुरवठा निवेदेसाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगितले जात असुन या समितीतील एक सदस्य आजारी असल्याने कोविड-१९ च्या कामासाठी सफाई कामगारांची निविदा उघडण्यात येत नसल्याचे कारण मनपा प्रशासनाकडून पुढे केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.
जळगाव शहरातील साफसफाईचे काम करणाऱ्या वाॅटर ग्रेस कंपनीला मनपा प्रशासनाकडून पुन्हा शहरातील साफसफाई व स्वच्छतेचे काम देण्याच्या हालचाली होत आहेत. याबाबत कायदेशीर अडचणी आल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील असे दोन दिवसापूर्वीच महापालिका आयुक्तांना पत्र देणाऱ्या नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी कोविड-१९ विशेष कामासाठी सफाई कामगार पुरवठा करण्याच्या कामाची निविदा उघडण्यास होत असलेल्या विलंबाबाबत बोट ठेवले आहे. शहरात कोरोनाचा कसर सुरू असताना महापालिका प्रशासनाला त्याचे कोणतेही गंभीर नसल्याचे वास्तव त्यांनी मांडून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *