मांडवा येथील पांधण रस्त्याचे भाग्य केव्हा उजळणार..?

विदर्भ

• पावसामुळे रस्ता झाला चिखलमय


•  पांधण रस्ता विकास योजनेअंतर्गत रस्त्याचे काम करण्याची मागणी


पुसद, दिनांक १ ऑगस्ट

तालुक्यातील मांडवा गावातील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून चिखलयुक्त रस्त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पांधण रस्त्यांसंदर्भात पालकमंत्री पांधण रस्ता विकास योजनेअंतर्गत बळीराम मंदाडे यांच्या शेतापासून ते बंडू गादेवार यांच्या शेतापर्यंत तसेच मांडवा ते कारला पांधण रस्त्याचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजी ठराव देखील पास केले आहे. मात्र या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना अजून प्रत्यक्षात करावी लागत असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.

विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या ठरावाची दखल घेऊन तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या पुसद येथील उपविभागीय अभियंत्यांना सन २०१८ मध्ये पत्र पाठवून नियमानुसार कार्यवाही करण्याचे कळविले आहे. परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही मांडवा येथील पांधण रस्त्याचे भाग्य उजळलेले नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मांडवा येथील पांधण रस्त्यावरून शेतीकामासाठी सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी ये-जा करत असतात.  बहुतेक वेळेस शेतकऱ्यांचे डोक्यावर बी-बियाणे, शेतीकामाची अवजारे असतात. मात्र पावसामुळे संपूर्ण पांधण रस्ता चिखलयुक्त झाल्याने बैलगाडी नसलेल्या शेतकऱ्यांना मोठी कसरत करून रस्त्यातून मार्गक्रमण काढावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून तातडीने पालकमंत्री पांधण रस्ता विकास योजनेअंतर्गत रस्त्याचे काम करण्यात यावे तसेच  चिखलामुळे  रस्त्याची दुरवस्था झाल्याने मुरूम टाकून रस्ता चालणे योग्य करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *