लाचखोर विशेष लेखा परीक्षक रावसाहेब जंगले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव

• सहकारी संस्थाचे ऑडिट छाननी छाननी करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.


जळगाव,दिनांक ६ ऑगस्ट

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या ऑडिटची छाननी करण्यासाठी ३२ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले जिल्हा विशेष लेखा परीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (रा. गंगासागर अपार्टमेंट, रामानंद नगर, जळगाव) यांना न्यायालयाने ७ ऑगस्ट पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखापरीक्षकांनी केलेल्या ऑडिटची छाननी करून चांगला अहवाल तयार करून देण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब जंगले यांनी तीन प्रमाणित लेखा परीक्षकांकडे ५२ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासकीय इमारतीसमोर तीन प्रमाणित लेखा परीक्षकांकडून ३२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जंगले यांना काल बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात रामानंद नगर पोलिस ठाण्यात जंगले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब जंगले यांनी तक्रारदारकडून ७ हजार, साक्षीदाराकडून १० हजार, दुसऱ्या साक्षीदाराकडून २० हजार व दुसऱ्या साक्षीदाराकडून १५ हजार अशी एकूण ५२ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी बुधवारी रात्री ३२ हजार रुपये लाच घेताना रावसाहेब जंगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारित) अधिनियम २०१८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विशेष लेखा परीक्षक रावसाहेब जंगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात बाजू मांडताना सांगितले, जंगले हे औरंगाबाद येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या नावावर असलेली स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती आणि बँक खात्याचे तपशील जाणून घेण्यासाठी पाच दिवसांच्या पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने रावसाहेब जंगले यांना ७ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *