बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट

राष्ट्रीय

• भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावातील घटना


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ८ ऑगस्ट

निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्या काही नतद्रष्ट पुढाऱ्यांना छत्रपतींच्या आदर्श यांचा विसर पडत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून कन्नाडीगांच्या दबावाखाली हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यात आला.महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. व त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा पुतळा बसवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका सीमाभागातील समाज माध्यमातून व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटक शासनाला वावडे आहे का? असा शिवप्रेमी नागरिकांमधून सवाल केला जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमागे भाजपाशासित  कर्नाटक सरकारची पोलिसांना फुस असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्तत होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *