आठवडी बाजारातील सट्टा जुगारावर पोलिसांचा छापा; मुद्देमालासह आरोपी अटकेत

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक २५ ऑगस्ट

आठवडी बाजारातील  सार्थक लॉटरी सेंटर समोर सुरू असलेला श्रीदेवी वरळी मटका सुरु असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद पोलिसांनी छापा टाकून आरोपींना मुद्देमालासह अटक केली.

पुसद शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा मटका जुगार सुरू असल्याची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडी बाजारात सुरू असलेला श्रीदेवी वरळी मटका जुगार पोलिसांनी उध्वस्त केला. या छाप्यात आरोपींच्या अंगझडतीतून रु.७५५० व‌ दोन मोबाईल असा १८७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यासंदर्भात गजानन मनोहर मगर (राहणार विठ्ठला वार्ड, पुसद) व विनोद पुरुषोत्तम घाडगे (राहणार श्रीरामपूर, पुसद) यांचे विरुद्ध मुंबई जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जुगाराला सहाय्य करणाऱ्या विकी निजामुद्दीन गौरी (रा. लोहार लाईन, पुसद) याच्याविरुद्ध आयपीसी कलम १०९ अन्वय पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणाऱ्या पोलिस पथकामध्ये  अब्दुल नईम, संजय चव्हाण, अभिषेक इंगळे हर्षद पंडितकर, रेहान खान यांचा समावेश होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *