घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथराव खडसे यांच्यावर पलटवार

राजकीय राज्य

• पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडले होते टिकास्त्र


सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ११ सप्टेंबर

      “ एकनाथराव  खडसे यांच्या जीवनावर आधारीत सुनील नेवे लिखित पुस्तकाचे खडसे यांच्या हस्ते प्रकाश झाले. या प्रकाशन कार्यक्रमात एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.खडसे यांनी काल केलेल्या टीकेला फडणवीस यांनी आज उत्तर दिले. ‘मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही’, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांना लगावला आहे.”


भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी फडणवीस यांच्यावर काल पुन्हा एकदा थेट नाव घेऊन टीका केली होती. खडसे यांनी म्हटले होते की, आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?. नाथाभाऊ हा अन्याय सहन करणाऱ्यांपैकी मुळीच नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. आपण पक्षाच्या विरोधात बोलणार नाही. परंतू, न्याय मिळेपर्यंत पक्षाला प्रश्न विचारत राहणार.

. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवार,दिनांक ११ सप्टेंबर रोजी  प्रत्युत्तर दिले आहे.खडसे यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, मी अद्यापही संयम बाळगून आहे. घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही. एकनाथराव खडसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी टीका, टीप्पणी करणार नाही. परंतू, ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणावरुन बोलतात त्याबाबत मी एक नक्की सांगतो की, खडसे यांना त्या प्रकरणावरुन राजीनामा द्यावा लागला नाही.वास्तवात भंगाळे याने आरोप केल्यानंतर मी स्वत: एक कमिटी तयार केली. या कमिटीला 12 तासात अहवाल द्यायला सांगितला. त्यानंतर बारा तासातच त्यांना क्लिन चिट मिळाली.

फडणवीस म्हणाले की,या क्लिन चिटलाही एकनाथराव खडसे जर ड्राय क्लिनर म्हणत असतील तर त्याबाबत मला माहिती नाही. मनीष भंगाळे याला अटक झाली होती. तो काही काळ तुरुंगातही होता. दरम्यान एमआयडीसी प्रकरणात खडसे यांनी स्वत: बैठका घेऊन निधी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान,काल एकनाथराव खडसे यांच्यावर सुनील नेवे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलताना खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपण ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच लिहिणार आहोत, अशी घोषणाही एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात केली. चार-दोन राजे लाचार झाले आणि इंग्रजांना मिळाले तसाच हा कार्यक्रम आहे. माझ्यावर दाऊदशी संबंध असलेल्याचे आरोप करणाऱ्या मनीष भंगाळे याला सन्मानाची वागणूक मिळते. आपल्याकडे याबाबतचे पुरावे आले आहेत. या पुस्तकात आपण हे सगळे लिहिणार आहोत, असेही खडसे यांनी म्हटले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *