हिंदू- मुस्लिम धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अमळनेर येथील हजरत जिंदा शहा मदार शहा बाबा दर्ग्यावर रेल्वेची वक्रदृष्टी ; भाविकांमध्ये संताप

जळगाव सामाजिक

• दर्गा हटविण्याचा प्रयत्न झाल्यास भाविकांच्या उद्रेक होण्याची शक्यता


अमळनेर,दिनांक १३ सप्टेंबर 

शहरातील बंगाली फाईल परिसरातील हिंदू मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जिंदा शहा मदार शहा बाबा यांचा सुमारे १३० वर्षापासून असलेला दर्गा हटविण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून सुरू असल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात मुस्लिम युथ युवा फाऊंडेशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार निवेदन देऊन दर्ग्याच्या छोटेखानी बांधकामाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बंगाली फाईल परिसरात असलेल्या हजरत जिंदा शाह मदार शाह बाबा यांच्या दर्ग्यावर प्रत्येक गुरुवारी मोठ्यासंख्येने हिंदू – मुस्लिम समाजातील भाविक  आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येऊन फातेहा वाचतात.दर्ग्यालगत छोटे मंदिर असून हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून दर्गा आणि मंदिर यांची देखभाल दोन्ही समाजातील नागरिक करत असतात.

मात्र, हजरत जिंदा शाह मदार शाह दर्ग्यावर रेल्वेची वक्रदृष्टी पडली असून १६ सप्टेंबर रोजी मोठा फौजफाटा व बंदोबस्त घेऊन दर्गा हटविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे भाविकांमध्येे उद्रेक होण्याची शक्यता असून शांत असलेल्या अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

संदर्भात मुस्लिम युथ युवा फाउंडेशनने  रेल्वेमंत्री, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुंबई, जळगावचे जिल्हाधिकारी, अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, अमळनेर रेल्वे मंडळ अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जिंदा शहा मदर शहा बाबा यांच्या जीर्ण झालेल्या चबुतराचे व शेडचे बांधकाम करण्यात येत आहे. दर्ग्याच्या जवळ असलेले छोट्या मंदिरचा जीर्णोद्धार हिंदू मुस्लिम बांधवांनी करून मोठ्या स्वरूपात बांधले आहे. मात्र भाविकांच्या भावना लक्षात न घेता कोणताही अडथळा येत नसतानाही जाणीवपूर्वक दर्ग्याचे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे प्रशासना विरुद्ध कारवाई करण्यात यावी.

निवेदनावर मुस्लिम युथ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, नगरसेवक फिरोज मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार, अॅड. शकील काझी, अॅड. सलीम खान, अखतर अली सैय्यद, साबीर पठाण, कमलोद्दीन शेख, इक्बाल शहा यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *