कृषीसंबंधी विधेयकाच्या निषेधार्थ अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याने मोदी सरकारला धक्का

राजकीय राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १७ सप्टेंबर

                  “ केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या कृषी संबंधित विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. हरसिमरत कौर या एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आहेत.”


हरसिमरत कौर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, ‘शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याचा मला अभिमान वाटतो.’

गेली सहा वर्ष शिरोमणी अकाली दल मोदी सरकारसोबत सत्तेत आहे. मात्र, अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने संसदेत आणलेल्या कृषी अध्यादेशाला शिरोमणी अकाली दलाने संसदेत विरोध केला होता.कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य विधेयक-२०२० आणि शेतकरी किंमत आश्वासन करार आणि कृषी सेवा विधेयक-२०२० वर झालेल्या चर्चेत भाग घेताना सुखबीर बादल म्हणाले की, ‘शिरोमणी अकाली दल हा शेतकर्‍यांचा पक्ष आहे आणि या कृषी संबंधी विधेयकाला आमचा विरोध आहे.’

पंजाबमधील शेतकऱ्यांनी अन्नाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत जे सरकार आले आहेत. त्यांनी कृषी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहे. परंतु केंद्र शासनाने संसदेत आणलेल्या अध्यादेशाने त्यांची ५० वर्षांची तपस्या संपून जाणार आहे.’ असंही सुखबीर बादल म्हणाले.

या पार्श्वभूमीवर,मोदी सरकारने आणलेल्या कृषीसंबंधी विधेयकाला विरोध करत हरसिमरत कौर बादल यांनी ‌ मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *