माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना नियुक्त करू नका – प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विंगचे यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

विदर्भ

पुसद | राजेश ढोले, दिनांक २३ सप्टेंबर

राज्य शासनाने कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेची सुरुवात केली असून त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून या अभियानांतर्गत सर्वेक्षण कामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवून शिक्षकांकडून जबरदस्तीनेेे सर्वेक्षण केले जात आहे. यासंदर्भात प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर विंग ( PROTAN) यांनी पुसद तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माझेेेे कुटुंंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत शिक्षकांना सर्वेक्षणाचेे काम देऊ नयेे अशी विनंती केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांना आपले कामकाज नियमित व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी covid-19 च्या संबंधित कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना covid-19 च्या संबंधित कामकाजातून मुक्त करण्यात यावे.अशा प्रकारचे आदेश शासनाने दि. 17 ऑगस्ट 2020 च्या आदेशाने दिलेले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवून शिक्षकांना ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाचे काम दिल्या जात आहे.
यापूर्वीही आपत्ती व्यवस्थापन निवारणासाठी राज्यातील शिक्षकांनी इतर कर्मचार्‍यांच्या बरोबरीने चेक पोस्ट, सर्वेक्षण, राशन वाटप करणे,कोविड कॉल सेंटर व अन्य जोखमीच्या
जबाबदाऱ्या शिक्षकांनी शासन आदेशाप्रमाणे वेळोवेळी पार पाडलेल्या आहेत. या जोखमीच्या ड्युटी बजावत असताना अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शिक्षकांना कोविड सर्वेक्षणाची ड्यूटी देण्यासाठी त्यांची सेवा अधिग्रहित करण्याबाबत कोणतीही सूचना अथवा निर्देश शासनाने दिलेले नाहीत. त्या ऐवजी पर्यायी व्यवस्था शासनाने सदर आदेशात सुचविलेली असताना बळजबरीने शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामासाठी लावणे हे सदर आदेशाचे उल्लंघन आहे तसेच शिक्षकांना त्यांच्या नियमित कामापासून वंचित करून विद्यार्थी, पालक, समाज यांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान करणारे व शिक्षकांना वेठीस धरून या सर्वांवर अन्याय करणारे आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे,    खरे तर ‘माझे कुटुंब माझी – जबाबदारी’ ही मोहीम पूर्णपणे लोकप्रतिनिधींनी नामनिर्देशित केलेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणि जनता सहभागातून राबवायची आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन बक्षीस योजना घोषित करण्यात आलेली आहे. स्वयंसेवकाच्या सहभागासाठी बक्षीस योजना आहे त्यांना सहभागी केले नाही तर बक्षीस कोणाला देणार ? या मोहिमेत जनसहभाग कसा राहणार ? असेही प्रश्‍न उपस्थित होत नाहीत का ?तसेच या मोहिमेत शिक्षकांना सहभागी करण्याची कोणतीही सूचना शासन स्तरावरून नाही.
या सर्व बाबींचा विचार करता ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत शिक्षकांना कोविड-१९ सर्वेक्षण ड्युटी देण्यात येऊ नये. तसेच उपरोक्त शासन आदेशाचे पालन व्हावे ही विनंती करण्यात आली आहे. अन्यथा याबाबत सनदशीर मार्गाचा अवलंब करून या अन्यायकारी धोरणाचा संघटनेकडून विरोध करण्यात येईल असेही कळविण्यात आले.
निवेदन देताना RMBKS,प्रोटानचे तालुकाध्यक्ष परमेश्वर खंदारे,भगवान हनवते, ज्ञानेश्वर कोकणे, संतोष सुरवाडे, महेंद्र कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *