आदिवासी समुदायाचा अपमान करणाऱ्या कलर्स वहिनीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

नंदुरबार

• कलर्स टीव्ही वाहिनीवरील खतरा खतरा खतरा हा शो बंद करून आदिवासी समुदायाचा अपमान करणाऱ्या भारती सिंग व वाहिनीच्या संपादकांना अटक करण्याची मागणी


नंदुरबार| प्रफुल्ल राणे (जिल्हा प्रतिनिधी)

दिनांक २९ सप्टेंबर

कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या खतरा खतरा खतरा या कार्यक्रमात आदिवासी समुदायाबद्दल अश्लील हावभाव करत अवमानजनक भाषा वापरणाऱ्या भारती सिंग व कलर्स वाहिनीच्या संपादकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच “खतरा खतरा खतरा” हा कार्यक्रम बंद करण्यात यावा अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने केली आहे.

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तळोदा येथील पोलिस निरीक्षकांना आज मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी निवेदन दिले. कलर्स वाहिनीवर “खतरा खतरा खतरा” या कार्यक्रमाचे प्रसारण होत आहे. या कार्यक्रमात भारती सिंगने (रा.अमृतसर, पंजाब)                 “ आदिवासी लोगही ऐसा कच्चा (अंडरविअर) पहनते होंगे..! ऐसावाला” असे सांगत अश्लील हावभाव करून आदिवासी समाजाचा जातीय अपमान केला आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारती सिंगच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक  अश्लील शिविगाळ करणे,जातीवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाचा अपमान करणे, जातीवाचक बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करणे इत्यादी गैरप्रकार काही समाजकंटकांद्वारे जाणीवपूर्वक सुरूच आहे. अशा समाजकंटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी थांबवला पाहिजे. नाहीतर अशा समाजकंटकांविरोधात आदिवासी समाजातर्फे आंदोलनाद्वारे तीव्र रोष व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून भारती सिंग यांच्या कलर्स टिव्ही वरील खतरा खतरा खतरा हा शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.अन्यथा संपूर्ण आदिवासी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे तर यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणपत पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे, सचिव फत्तेसिंग दादा, शंकर दादा इत्यादी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *