केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता , दिनांक ८ ऑक्टोबर

“ भारतीय राजकारणातील वैचारिक भूमिका असलेले ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आज गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पासवान यांच्या मृत्यची बातमी त्यांचाा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून  दिली आहे.”


 

1969 पासूनच रामविलास पासवान यांनी राजकारणात विविध पदांवर काम केलं. आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ ते सत्ताधारी पक्षांसोबतच होते. त्यामुळे त्यांना राजकारणातले हवामान शास्त्रज्ञ असं संबोधलं जायचं.

बिहार पोलिसातील नोकरी सोडून रामविलास पासवान राजकारणात आले. कांशिराम आणि मायावती यांच्या लोकप्रियतेच्या काळातही बिहारमध्ये दलितांचे प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जात असे.

 

रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द ५० वर्षांची राहिली. १९९६ नंतर ते पूर्णवेळ सत्तेत होते. १९९६ नंतरच्या प्रत्येक सरकारमध्ये ते सहभागी होते. यामध्ये त्यांना प्रत्येकवेळी मंत्रिपद उपभोगायला मिळालं.

देवेगौडा-गुजराल यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह आणि आता नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलं.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल-भाजप आघाडीमध्ये रामविलास पासवान यांनी त्यांच्या पक्षाला ६ जागा मिळवून देण्यात यश मिळवलं. या सहाच्या सहा ठिकाणी त्यांच्या पक्षाने विजय मिळवला. तसंच स्वतःला आसाममधून राज्यसभेतलं तिकीट मिळण्याची सोयही त्यांनी करून ठेवली.

 

बिहारमध्ये निवडणुका सुरू असतानाच पासवान यांचं निधन झालं आहे.

आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करताना चिराग यांनी लिहिलं, “पप्पा, तुम्ही आता या जगात नाही. पण मला माहीत आहे, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल, मिस यू पप्पा.”

रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये ग्राहक संरक्षण मंत्री होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना प्रकट केली आहे.राहुल गांधी यांनी ट्विट करत रामविलास पासवान यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे. गरीब-दित वर्गाने आपला एक बुलंद राजकिय आवाज गमावला. त्यांच्या परिवाराच्या दुखात मी सहभागी आहे.प्रियंका गांधी वाड्रा यांनी असे म्हटले आहे की, रामविलास पासवान हे वर्षांपासून माझ्या आईचे शेजारी राहिले आहेत. त्यांच्या परिवारासोबत आमचे खासगी नाते होते. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख झाले आहे. चिराग आणि परिवारासोबत मी आहे. या दु:खाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्री रामविलास पासवान यांनाा श्रद्धांजली वाहिली जाते.“ रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे,”असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *