हनी ट्रॅप…., मनी ट्रॅप…, बदनामीच्या युद्धातील कलंकित चिखलफेक

जळगाव


• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात दडलेले रहस्य


• अभिषेक पाटील यांचा आरोप तर मनोज वाणी यांचा पलटवार ; कल्पना पाटील यांच्याकडून विनोद देशमुख टार्गेट तर विनोद  देशमुख यांची संयमी प्रतिक्रिया


 सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १ नोव्हेंबर

 

आपल्याला हनीट्रॅप मध्ये फसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवा व्यायसायिक मनोज वाणी यांनी घेतलेली पत्रकार परिषद जळगाव शहरातील युवक कार्यकर्त्यांच्या राजकारणातील एक कलंकित अध्याय आहे यात नेमके वास्तव काय आहे ? कोण कोणाला फसविण्याचा प्रयत्न करतो आहे हे कालांतराने उघकीस येईलच…. पण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये एकमेकांवर चिखल फेक सुरु आहे ते पाहता या मागे निश्चितपणे “सती सावित्रीचा आव….माझ्या विरुद्ध पुरावे दाव ” असा बदनामीचा निंदनीय खेळ सुरु असल्याची शंका येते.


या प्रकरणातील केंद्र बिंदू असलेले अभिषेक पाटील, युवा व्यावसायिक मनोज वाणी व चर्चेत आलेली आंटी यांचा एकमेकांशी व्यक्तिगत संबंध किंवा ओळख नसल्याचे आता पर्यंतच्या जाहीर व्यक्तव्य व पत्रकार परिषदांवरून समोर आले आहे. आता हे प्रकरण कसे “टर्निंग पॉईंट ” घेते याची उत्सुकता आहेच. पण, झाकली मूठ….. या प्रमाणे कोणाची तलवार म्यान होते. हे समोर येईलच.

“मी “…. “तो”…. आणि “ती “…..!
जळगाव जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या राजकीय हनीट्रॅपच्या घटना एखाद्याचे राजकीय कारकीर्द उध्वस्त करणारे ठरू शकते याचा अनुभव एका तत्कालीन खासदार व तत्कालीन आमदार अशा बड्या नेत्यांना आला आहे. आता कथित हनी ट्रॅप व मनी ट्रॅपचा आरोप- प्रत्यारोप पुराव्यांच्या प्रतीक्षेत नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. हनीट्रॅप ते मनीट्रॅप यामध्ये अभिषेक पाटील, मनोज वाणी व आंटी या तिघांची भूमिका स्पष्ट होत आहे. बदनामीच्या चिखलफेकीच्या युद्धाची सुरुवात नेमकी कोणी व कशी केली याबाबत दोघं तिघा बाजूंकडून स्पष्टता नाही. मात्र अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मला हनीट्रॅप मध्ये फसविण्याचा प्रयत्न एका आंटीच्या मार्फत सुरु असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली खरी. मात्र, यात काहीतरी गडबड असल्याचेही दिसून आले. अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना या प्रकरणात चर्चेत आलेली आंटी शहरातील अनेक पुढाऱ्यांना महिला पुरवत असल्याचा गौप्यस्फोट केला. ही माहिती आंटीनेच दिल्याचे अभिषेक पाटील यांनी सांगितले. या माहितीमुळे शहरातील अनेक पुढाऱ्यांच्या चारित्र्यावर प्रत्यक्ष शिंतोडे उडवले गेले. हे आरोप खरे मानले तर जळगाव शहराच्या राजकारणात रम….. रमा…..रमी …… हा प्रकार शहराच्या राजकारणात सुरु असल्याचे दिसत आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत देताना अभिषेक पाटील यांचा राजकीय अनुभव कमी पडला. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे शहरातील पुढाऱ्यांच्या चारित्र्याकडे संशयाने पहिले जाईल याची जाणीव कदाचित अभिषेक पाटील याना आली नसावी.
अभिषेक पाटील यांच्या पत्रकार परिषदेत उल्लेख करण्यात आलेले मनोज वाणी हे युवा व्यावसायिक आहे.त्यांनी प्रत्युत्तरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक पाटील यांच्यावर पलटवार करत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले. मनोज वाणी यांची अभिषेक पाटील यांच्याशी व्यक्तिगत ओळख असल्याचा नकार दिला आहे. त्यांच्याशी माझे कोणतेही संभाषण नाही, राजकीय किंवा व्यावसायिक स्पर्धा देखील नाही.तसेच अभिषेक पाटील एवढे मोठे नेते नाहीत की त्यांना कोणीही हनीट्रॅप मध्ये अडकविण्याचा प्रयत्न करेल. उलट अभिषेक पाटील यांनी माझ्या विरुद्ध एकही पुरावा सादर केला नाही असे मनोज वाणी यांनी सांगितले आहे. हे सांगत असताना मनोज वाणी यांनी अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्रीनी अनेक गरीब तरुणांना लाखो रुपयात फसविले असल्याचे सांगून तसेच अभिषेक पाटील महिलांना पुढे करून शहरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात अशी धक्कादायक माहिती दिली. एवढेच नाही देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या दिवंगत माजी सैनिकाच्या परिवाराला अशाच पद्धतीने अभिषेक पाटील व त्याच्या मातोश्री यांनी १७ लाखात गंडविले आहे असा पलटवार मनोज वाणी  यांनी केला. मनोज वाणी यांनी गाडेगाव नजीक असलेल्या टर्निग पॉईंट हॉटेल कोणाच्या मालकीची होती असा सवाल विचारला आहे. खरे पाहता काही वर्षांपूर्वी हॉटेल टर्निंग पॉईंटवर पोलिसांनी छापा टाकून देह विक्री करणाऱ्या काही महिलांविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता हे नाकारून चालणार नाही. काही महिन्यापूर्वी पिंप्राळा येथे चालणाऱ्या एका अपार्टमेन्ट मधील कुंटणखान्यात पकडलेल्या महिला कोणाशी संबंधित होत्या हे आपल्याला माहित असल्याचा दावा करून याबाबतचे सर्व पुरावे पवार साहेब, अजित दादा, नाथाभाऊ आणि देवकर अप्पा यांना ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सोपवून देणार आहे असे सांगून मनोज वाणी यांनी अभिषेक पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मुलासाठी आई मैदानात

याच दरम्यान अभिषेक पाटील यांच्या मातोश्री राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हनी ट्रॅप प्रकरणात विनोद देशमुख यांच्यावर निशाणा साधून वृत्तपत्रात आलेल्या काही बातम्यांचे कात्रण दाखवले.त्यांच्या बोलण्यातून विनोद देशमुख हे काही काम करत नसताना कोट्यधिश कसे झाले हा उल्लेख करण्यात आला.विनोद देशमुख खरेच कोट्यधीश आहेत का याबाबत त्यांनी देशमुख यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचा, बँक तपशिलाची माहिती देणे अपेक्षित होते.मात्र केवळ आरोप करून व्यक्तिगत दुखणे काढण्याचा प्रयत्न झाला. पिंप्राळा येथील कुंटणखाना चालवणारी महिला राष्ट्रवादी असंघटीत कामगार महिला संघटनेची पदाधिकारी असल्याचे मात्र कल्पना पाटील यांनी मान्य केले.परंतु या महिलेसोबत सबंध असल्याचे त्यांनी अमान्य केले.तसेच टर्निंग पॉइंट हॉटेल जागेची मालकी जरी माझी होती तरी हॉटेल एका कंपनीला सन 2007 मध्ये  चालविण्यासाठी दिली असल्याचा त्यांनी करारनामा दाखवला. परंतु, कल्पना पाटील यांच्या पत्रकार परिषदेत हनी ट्रॅप प्रकरणाविषयी कमी अन विनोद देशमुख यांच्यावर आरोप जास्त केले.

दरम्यान, कल्पना पाटील यांनी आपल्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत असे सांगून विनोद देशमुख यांनी आपण आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढत असल्याने जाणीवपूर्वक मला गोवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मत व्यक्त करून मी नेहमीच महिलांचा सन्मान करत आलेलो असून महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मी केलेले काम योग्य असल्याचे पत्र देखील दिले आहे. कल्पना पाटील यांनी उगाच वाऱ्यावर लाथा मारून माझ्याबाबत खोटी माहिती पसरवू नये. माझ्याकडे  कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा कल्पना पाटील यांनी पत्रकार परिषदेत आरोप केल्याने माझ्या कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी तपशीलासह जाहीर करावी तसे सिद्ध केल्यास त्यातील पन्नास टक्के रक्कम मी त्यांना देण्यास तयार आहे व २५ टक्के रक्कम पक्षनिधी म्हणून देईन असे आव्हान देशमुख यांनी दिले. मी आजही भाड्याच्या घरात राहतो. कोणाच्याही माना मोडून मोठे होणे हे माझे संस्कार नाहीत. असे विनोद देशमुख यांनी सांगितले.

सर्व घटनाक्रम पाहता  हे प्रकरण कोणत्या वळणावर येऊन पोहचेल हे समजेलच.या प्रकरणाचे रहस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीच्या भानगडीत दडले असल्याचे दिसून येत असून ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप या प्रमाणे तलवारी म्यान होण्याची शक्यता जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *