प्रा. बी.एन.चौधरी यांच्या कथेला राज्यस्तरीय गोंदण साहित्य पुरस्कार

जळगाव

धरणगाव, दिनांक १ नोव्हेंबर

 सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांच्या “भाऊबीज” या कथेला कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे प्रकाशीत होणाऱ्या गोंदण दिवाळी अंकाचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय गोंदण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संपादक प्राचार्य पी. के. गाडीलकर आणि सह संपादक दादाभाऊ गावडे यांनी एका पत्रान्वये पुरस्कारांची घोषणा केली.
गोंदण दिवाळी अंकाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे कथा, कविता स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षीही महाराष्ट्रातून अनेक लेखक, कवींनी यात सहभाग घेतला होता. या पैकी पाच कथा व पाच कवितांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. देहू येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. लाॅकडाऊन उठल्यावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
यापुर्वी प्रा.बी.एन.चौधरी  यांच्या “शेजारधर्म” या कथेला मंगळवेढा येथील शब्दशिवार प्रकाशनातर्फे राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार प्राप्त कथांचा कथा संग्रह प्रकाशीत झाला असून तो अॅमेझानवर उपलब्ध आहे अशी माहिती संपादक प्रा. नारायण घुले यांनी दिली आहे.
प्रा. चौधरी हे खांदेशातील सुप्रसिध्द साहित्यिक असून त्यांचा कथा, कविता, गझला, ललित लेखन अनेक प्रतिष्ठित दिवाळी अंकांमधून प्रसिध्द होत असते. या वर्षाच्या दिवाळी अंकात त्यांना मिळालेल्या या दुहेरी सन्मानाबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply