आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव

अमळनेर, दिनांक २ नोव्हेंबर

आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अमळनेर येथे पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे उदघाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनिल देशमुख अमळनेर   येथे  आलेले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशच्या सरकारने राज्यात दिशा कायदा लागू केला आहे. त्यानुसार बलात्कार प्रकरणात २१ दिवसात निकाल लावला जातो आणि दोषी आढळल्यास त्याला फाशीची शिक्षा सुनवण्यात येते. या नव्या कायद्याला ‘आंध्रप्रदेश दिशा गुन्हे कायदा’२०१९ असे नाव देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, लता सोनवणे, माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड. रवींद्र पाटील,राष्ट्रवादी  अल्पसंख्याक विभागाचे  प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *