कोरोना : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना स्थगिती

क्रीड़ा

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली


मुंबई : सिटीझन मिरर वार्ता

जगभरात प्रसिद्ध झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामने काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने स्थगित करण्यात आले आहेत. यासंदर्भात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

आज मंगळवार दिनांक ४ मे रोजी मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत दिल्ली येथे होणार होती. मात्र त्याआधीच हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली. दिल्ली संघातील अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचं वृत्त आहे. सोमवारी कोलकाता संघातील दोन तसंच चेन्नई संघातील तीन खेळाडूंना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्लीच्या मैदानाची व्यवस्था पाहणाऱ्या ग्राऊंडस्टाफपैकी पाच जणांना कोरोना झाल्याने आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
आयपीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवारी कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात अहमदाबाद इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुकाबला होणार होता.मात्र कोलकाताचे दोन खेळाडू फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बेंगळुरूचा संघ सामना खेळण्यास अनुत्सुक असल्याने आयपीएल प्रशासनाने ही लढत रद्द केली होती. आता हा सामना नंतर खेळवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं.

यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघातील अक्षर पटेलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच तीन निगेटिव्ह चाचण्यांनंतर तो मैदानात खेळायला उतरला. कोलकाता संघाच्या नितीश राणालाही कोरोना झाला होता. मात्र त्याने क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केली.निगेटिव्ह निकालानंतर तो सरावात सहभागी झाला. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्यरत ग्राऊंडस्टाफपैकी दहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र तरीही मुंबईत दहा सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, अडम झंपा आणि अँड्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफेल हेही परतणार होते. मात्र ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा स्थगित असल्याने ते भारतातच आहेत. घरातील सदस्यांना कोरोना झाल्याने पंच नितीन मेमन स्वगृही परतले आहेत.
यापूर्वी घरात आणि नात्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
यंदाच्या हंगामात 60 सामने होणार आहेत. आतापर्यंत 29 सामने झाले होते. मात्र बायोबबलमध्येही कोरोनाचा प्रवेश झाल्याने यंदाचा हंगाम स्थगित करण्याची वेळ ओढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *