अध्यात्मिक जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध

सामाजिक

 लेखक :- उदय सपकाळे

जळगांव

मो. 8087130814

________________________________________

आज बुध्द पौर्णिमा..! या निमित्ताने खास वाचकांसाठी तथागतांच्या अलौकीक सम्यक विचारांची माहिती देणारा लेख  प्रसिद्ध करीत आहोत.


 

 

नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस !!
वैशाख पौर्णिमा, महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या त्रिविध जयंतीचा पवित्र दिवस. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ५६३ वैशाख पौर्णिमेला लुम्बिनी येथे झाला,सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती ही वैशाख पौर्णिमेलाच बुद्धगया येथे झाली आणि त्यांचे महापरिनिर्वाण ही वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे झाले.
आज २५६५ वर्षांनंतर ही उत्खननात कुठे ना कुठे बुद्ध मूर्ती सापडत असते तरी ही बुद्ध आणि बुद्धाच्या शिकवणुकी विषयी आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत.जसे की राजपुत्र सिद्धार्थ गौतमाने एवढे राजवैभव, सुंदर तरुण पत्नी,आणि नवजात पुत्राचा त्याग करून वैराग्याचे खडतर जीवन का स्वीकारले? त्याच्या शोधाचे एकमेव उद्दिष्ट काय होते? त्यांना सम्यक संबोधीतून ज्ञानप्राप्ती झालेला मध्यम मार्ग कोणता? चार आर्यसत्य कोणती? तसेच अध्यात्मिक जगतातील त्यांचे चौऱ्यांशी हजार उपदेश समाविष्ट असलेला धम्म आणि संघ कोणता? इत्यादी विषयांचे निराकरण आणि निष्कर्ष समजणे आवश्यक आहे.
सिद्धार्थ गौतमाच्या शोधाचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे त्यांना या सत्याचा रहस्यभेद करायचा होता की प्राण्यांच्या(मानव) दुःखाचे खरे कारण आणि ते निवारण करण्याचा खरा उपाय कोणता आहे? त्याच्या शोधासाठी त्याने आपल्या वयाच्या २९ वर्षांपासून वयाच्या ३५ व्या वर्षांपर्यंत सहा वर्षे सतत खडतर तपश्चर्या, कष्ट, पराक्रम केला त्या काळातील प्रचलित सात ध्यान साधना ही केल्यात, त्याकाळी जवळपास सर्वच परंपरांमध्ये अशी समजूत होती की सहा इंद्रियांचा(डोळे,नाक,कान, जीभ,त्वचा आणि मन)आपापल्या विषयांशी(रूप,गंध,शब्दच,स्पर्श,आणि चिंतन)संपर्क होत असतो या कारणामुळे तृष्णा जागृत होत असते.म्हणून हा सर्वमान्य उपदेश प्रचलित होता की इंद्रियांचा विषयांना स्पर्श झाला तर तृष्णा निर्माण होते व दुःख होते म्हणून एन्द्रीय विषयांशी संपर्क झाल्यावर राग-द्वेष मोह युक्त प्रतिक्रिया करायची नाही.
परंतु हाडांचापिंजर होईपर्यंत तपश्चर्या सुरू असलेल्या या तपस्वी राजकुमाराचे या उत्तराने समाधान झालेले नव्हते त्याला असे वाटले की हे तर केवळ भासमान सत्य आहे, हे अंतिम सत्य नाही,अपुरे सत्य आहे पूर्ण सत्य नाही.अपुऱ्या सत्याच्या पालनाने अर्धवटच दुःख मुक्तीचा लाभ होईल,पूर्णलाभ होऊ शकत नाही.मग त्याने विचार केला की मी सहा वर्षे झालीत एव्हढी शरीराला टोकाचे क्लेश, त्रास देण्याची प्रचलित साधना करतोय, पोट पाठीला टेकलय, शरीरात कोणताही त्राण शिल्लक राहिलेला नाही, अश्या या टोकाच्या साधनेने काहीही साध्य होणार नाही,अंतिम सत्य सापडण्या आधी शरीर नष्ट होईल. म्हणून मध्यम मार्गाचा अवलंब करीत त्याने अन्नग्रहण करून गये च्या प्रस्थान केले. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या बोधीवृक्षाखाली बसून त्याने सम्यक संकल्प करीत अधिष्ठाण केले की अंतिम सत्य कळल्या शिवाय मी येथून उठणार नाही. आणि त्याच रात्रीच्या पहिल्या प्रहरात तो बोधिसत्व पहिल्या ध्यानात समहित होऊन त्यानंतर क्रमशः दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ध्यानात स्थापित झाला.रात्रीच्या पहिल्या प्रहरातच बोधिसत्वाला दिव्यचक्षु,दिव्याश्रोत, आणि त्यांच्या आधारे पूर्वजन्माच्या स्मृतींचे अभिज्ञान प्राप्त झाले,त्याच बरोबर परिचित्तज्ञान प्राप्त झाल्यावर काळ जाणून घेण्याचे अभिज्ञान प्राप्त झाले, बोधिसत्व जेंव्हा रात्रीच्या अंतिम प्रहरात पोहचला तेव्हा त्याला आश्रव,क्षय,म्हणजे चित्तमळाच्या स्रावाचा नितांत क्षय होण्याचे अभिज्ञान प्राप्त झाले,त्यानंतर जेव्हां सर्व लोकांच्या पलीकडील वास्तविक, नित्य, शाश्वत,सत्याचा परिपूर्ण साक्षात्कार झाला.तेव्हा त्याच बरोबर त्याला सर्वज्ञतेचे महाज्ञान प्राप्त झाले.सम्यक संबोधी प्राप्त झाली.
अध्यात्मिक जगतातील या सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकाने २५६५ वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक वैज्ञानिक यंत्राचा आधार न घेता आपल्या मनोबलाने हे सत्य जाणून घेतले की भरीव, ठोस वाटणारे आपले शरीराचं नव्हे तर समस्त भौतिक जग वस्तुतः भरीव,ठोस नाही, हे केवळ भासमान सत्य आहे.परामसत्य तर हे आहे की भौतिक जगातले सर्व पदार्थ असंख्य लहान लहान परमाणू कणांपासून बनलेले आहेत जे इतके लहान आहेत की सामान्य डोळ्यांनी दिसुसुद्धा शकत नाहीत.त्यांना पाली भाषेत कपाल म्हटले, हे कपाल पण स्थिर नाहीत,भरीव ,ठोस नाही.प्रत्येक क्षणी प्रज्वलित – प्रकम्पित होत असतात *’सब्बो पज्जलितो लोको, सब्बो लोको पकमपीतो’* या प्रकम्पनाच्या तरंगा मध्ये उदय-व्यय म्हणजे निर्मिती आणि लय होत असतो, उत्पाद होणे आणि व्यय पावणे ही अनित्यता हाच त्यांचा धर्म आहे स्वभाव आहे आणि ही क्षणोक्षणीची अनित्यता मी , माझे हा आत्मभाव कसा टिकू देईल म्हणून अनात्म बोध जागरूक होऊन नंतर दुःख बोध जागतो.
या दुःख चक्राचे भेदन करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्रप्रवर्तन सारनाथ येथे आपल्या साथीदार भिक्षूंजवळ केले. या वेळी तथागतांनी चार आर्य सत्यांना आख्यात केले ज्या मध्ये त्यांच्या शिकवूनिकीचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक असे दोन्ही भाग समाविष्ट होतात.
चार आर्य सत्य
१.दुःख आहे
२.दुःखा चे कारण आहे
३.दुःखा चे निवारण आहे
४.आणि या दुःख निवारण्याचा एक आर्य अष्टांगिक मध्यम मार्ग आहे.
या पहिल्या उपदेशात भगवान बुद्धांनी समजविले की गृहत्यागिनीं दोन टोकाचे मार्ग अंगिकारले आहेत एक असा मार्ग की ज्यावर चालणारा गृहत्यागी कामभोगाच्या कामसुखात मग्न राहणे श्रेयस्कर समजतो.ना सत्कर्म ना दुष्कर्म मानतो बेबंद, मुक्तकामभोगाचे समर्थन.हा एक असा टोकाचा मार्ग आहे.आणि दुसरा टोकाचा मार्ग कायाक्लेश चा आहे.जो कायेस वेदना, त्रास,दुःख दायक टोकाचा. या दोन्ही टोकाच्या मार्गाविरुद्ध असा मध्यम मार्ग मी शोधला आहे ज्याला अनुसरून चालल्याने अंतरचक्षु, ज्ञानचक्षु, प्रज्ञाचक्षु उघडले जातात,अविद्या नष्ट होते, प्रकाश प्रकट होतो.असा मार्ग की जो साऱ्या विकारांचे शमन करून शांती देणारा आहे. दुखमुक्तीचा कल्याणकारी मार्ग म्हणजे शील, समाधी, प्रज्ञेचा आर्य अष्टअंगिक मार्ग
सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका,सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी(जागृतता) हाच मध्यम मार्ग आहे.
हा मार्ग, ही विद्या ही साधना (विपश्यना)इतकी सुबोध, स्वच्छ आणि स्पष्ट आहे तरी सुद्धा आपापल्या सांप्रदायिक मान्यता आणि कर्मकांडाच्या जंजाळामुळे तसेच राग द्वेष मोहा मध्ये गोंधळलेले लोक ती समजून घ्यायला तयार होणार नाहीत मग अनुभव घेणे अनुसरणे तर दूरच असे चिंतन भगवान बुद्धांनी काही दिवस केले नंतर त्यांच्या अंतर्मनातून कारुण्याचा झरा प्रवाहित झाला तेव्हा त्यांनी कारुण्यदृष्टीने जाणले की काही लोक असे आहेत ज्यांच्या डोळ्यांवर या मिथ्यामान्यतेची जळमटे अगदी विरळ आहेत ते ह्या मार्गाने नैसर्गिक सत्याचे यथाभूत दर्शन करून स्वतः ला दुःख मुक्त करून घेऊन कल्याण साधतील या करुणेने भगवान बुद्धांनी आयुष्याची उरलेली पंचेचाळीस वर्षे लोकसेवाच लोकसेवा करण्यात दिली.ज्याला अनुत्तर विमुक्ती अवस्था प्राप्त झाली त्यांना आता केवळ करुणेने वाटण्याचेच काम होते, आणि ज्यांनी या मार्गाला अनुसरून आपली अविद्या घालवून बोधी जाकृत केली अश्या दुःख मुक्त झाल्याचा संघ तयार झाला त्या संघास ही त्यांनी ही विद्या , हा कल्याणकारी मार्ग बहुजन (जास्तीत जास्त) लोकांपर्यंत पोहचविण्याचा उपदेश आणि संदेश दिला.’बहुजन सुखाय, बहुजन हिताय’
भगवान बुद्धांनी हजारो जवळपास ब्यांशीहजार (८२ हजार) उपदेश दिलेत. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, ग्रहण शक्ती नुसार, योग्य शब्दांमध्ये, साध्या सरळ त्या वेळच्या लोकभाषा पाली मध्ये धम्म समजविला. धम्मात कुढलीही अंधभक्ती, कर्मकांड, चमत्काराना थारा दिला नाही, कुठलाही भेदभाव, उच्चनीच , गरीब- श्रीमंत,स्त्री -पुरुष असा कुढलाही भेद केला नाही, समता, शांती, करुणा, बंधुभाव जोपासण्याचा उपदेश तथागतांनी केला.विज्ञाननिष्ठ, निसर्गनियमांचा सरळ सरळ सार्वजनिक धम्म शिकविला. हे कारण असेल तर हा परिणाम येणारच, मनात विकार असेल तर त्या सोबत दुःख जागणारच कारण नसेल तर हा परिणाम येणारच नाही असा कम्मसिद्धांत ( कर्मसिद्धांत) मांडला. बुद्धांनी दिलेली शिकवण , त्यांचे ब्यांशी हजार उपदेश या साऱ्यांचे शुद्ध स्वरूपात संगायन करून पुढे त्याची विभागणी सुत्त पिटक, अधिधम्म पिटक आणि विनय पिटक अश्या तीन पिटकांचे त्रिपिटक बुद्धधम्माचा पवित्र ग्रंथ म्हणून लिखित स्वरूपात जपवणूक करण्यात आला. शेवटच्या श्वासापर्यंत दुःख मुक्ती चा धम्म उपदेश भगवान बुद्ध करीत राहिले. वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथे महापरिनिर्वाणच्या अंतीम काळात भन्ते आनंद यांनी भगवान बुद्धांना पुढे आमचा शास्ता कोण असे विचारले असता बुद्धांनी उपदेश केला.मी आख्यात केलेला धम्मच तुमचा शास्ता राहील, मी मार्गदाता आहे, दुःख मुक्ती साठी तुम्हाला प्रत्येकाला स्वतः च या मार्गावर चालून , स्वतःची बोधी जागृत करत ‘अत्त दीप भव ‘ बनायचे आहे
अश्या या महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्धांना वैशाख पौर्णिमेच्या मंगलं दिनी त्रिवार वंदन.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *