बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी घेतला बदलीचा लाभ; माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे पितळ उघडे

जळगाव

रावेर :-

अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून सोईच्या ठिकाणी बदली करून घेणाऱ्या रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवकांचा अफलातून चालुपणा माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून उघड झाला आहे.

सिटीझन मिरर चे रावेर तालुका प्रतिनिधी नजमोद्दिन शेख मुनीर (रा. खिरवड ता.रावेर) यांनी रावेर तालुक्यातील अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची माहिती पंचायत समिती कडे मागितली होती. पंचायत समितीने माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत पुरविलेल्या कागदपत्रात अनिल वराडे, विजय पाटील, राहुल लोखंडे, छाया नेमाडे, शामकुमार पाटील,संतोष मोरे, रवींद्रकुमार चौधरी या सात जणांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे अपंग प्रमाणपत्राची कोणतीही सत्यता न तपासता पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी वेळोवेळी बदल्यांचा लाभ दिल्याचे देखील समोर आले आहे.
या बनावटगिरी विरोधात नजमोद्दिन शेख मुनीर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रावेर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून  अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेणाऱ्या ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. शासनाची फसवणूक करून बनावट अपंंग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदली चा लाभ मिळवून घेतलेल्या सात ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची चौकशी करून कारवाई इ न झाल्यास उपोषणाचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *