वाट चुकलेला झारखंडचा मनोरुग्ण पोहचला रावेर शहरात थेट.. पो. कॉ. निलेश लोहार यांच्या तत्पर मदतीने झाली पालकांची भेट

जळगाव सामाजिक

कर्तव्य कठोर समजल्या जाणाऱ्या पोलीस दलात मानवी संवेदना नसतात असाच समज सर्वसामान्य जनतेचा असतो. मात्र खाकी वर्दित देखील माणूस दडलेला असतो.याचा प्रत्यय अनेकदा येतोच. असाच अनुभव रावेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पो. कॉ.निलेश लोहार यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या सातत्याने सुरू असलेल्या कार्यामुळे येत आहे.


रावेर / नजमोद्दीन शेख (प्रतिनिधी) :-

महिनाभरापासून घरातून निघून गेलेल्या झारखंड राज्यातील मनोरुग्ण युवकाला रावेर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. निलेश लोहार यांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन स्वाधीन करण्यात आले. या मनोरुग्ण युवकाला वेळेवर मदत मिळाली नसती तर खूप मोठा अनर्थ घडला असता अशी गहिवरल्या भावना या युवकाच्या परिवाराने व्यक्त करून पो. कॉ. निलेश लोहार यांचे आभार मानले.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, झारखंड राज्यातील रांची येथील  अशोक ठाकूर हा मनोरुग्ण युवक गेल्या एक महिन्यापासून भटकत भटकत शेकडो मैल दूर महाराष्ट्र राज्यात पोहचला. अत्यंत भयभीत अवस्थेत असलेला हा तरुण रावेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पो. कॉ. निलेश लोहार यांना दिसून आला. त्यांनी त्याची विचारपूस केल्यावर त्याला नीटपणे त्याची माहिती देता येत नव्हती. एवढेच नाही तर या मनोरुग्ण युवकाकडे असलेल्या बंद मोबाईल चार्ज करुन तपासल्यानंतर त्यातील व्हॉटसअप देखील बंद होते. कॉल लिस्ट सुद्धा कोरी असल्याने मेसेज बॉक्स मध्ये असलेल्या एकमेव संदेशाचा आधार घेऊन पो. कॉ. निलेश लोहार यांनी या युवकाची माहिती काढली असता तो झारखंड राज्यातील असल्याने आढळून आले. त्याच्या कुटुंबातील लोकांशी संपर्क साधून पो. कॉ. निलेश लोहार यांनी या मनोरुग्ण तरुण रावेर येथे असल्याची माहिती दिल्याने महिनाभरापासून शोध घेत असलेल्या या मनोरुग्ण युवकाच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मात्र, या मनोरुग्ण युवकाला त्याचे नातेवाईक घेण्याला येई पर्यंत त्याला कसे सांभाळणार हा अत्यंत जोखीम असलेला प्रश्न पो. कॉ. निलेश लोहार यांना पडला. त्यांनी तातडीने पो. नि.कैलास नागरे यांना या युवकाची माहिती देऊन त्याचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी येईपर्यंत त्याचा सांभाळ आपल्या पोलीस ठाण्यात करावा लागेल अशी गळ घातली. अशोक ठाकूर या मनोरुग्ण युवकाची अवस्था पाहून पोलिस निरीक्षक नागरे यांनी तत्काळ होकार देऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या तरुणाची योग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्या.

मनोरुग्ण असलेल्या अशोक ठाकूर यांच्यावर औषधोपचार सुरू होते. अचानक महिनाभरापासून तो कुठेतरी निघुन गेल्याने त्याचे नातेवाईक त्याचा सातत्याने शोध घेत होते. प्रयत्न करूनही अशोक ठाकूर याचा शोध लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय अत्यंत चिंताग्रस्त झाले होते. मनोरुग्ण असलेले अशोक ठाकूर यांची अवस्था काय झाली असेल याचा विचार करून कुटुंबीयाचा जीव कासावीस झाला होता. अचानक रावेर येथील पोलिस कर्मचारी निलेश लोहार यांनी फोनवर संपर्क करून त्यांच्या कुटुंबीयांना अशोक ठाकूर रावेर येथे  असल्याची माहिती दिल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अशोक ठाकूर यांचे कुटुंबीय झारखंड राज्यात छोटासा सलून व्यवसाय करतात.  येण्यासाठी आवश्यक पैशाची जमवाजमव करून ते रावेर येण्यासाठी निघाले.

या दरम्यान पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. निलेश लोहार यांनी अशोक ठाकूर या मनोरुग्ण युवकाची काळजी घेत त्याचा सांभाळ केला. यासाठी सहा. फौजदार इस्माईल शेख,पो. कॉ.संदीप घ्यार यांच्यासह मित्र संजय धोबी, निलेश हंसकर यांनी पो. कॉ. निलेश लोहार यांना मोलाची मदत मिळाली.

आज शनिवार दिनांक नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी मनोरुग्ण अशोक ठाकूर याचा पुतण्या उमेश ठाकूर व इतर नातेवाईक रावेर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी अशोक ठाकूर यांच्याकडे पाहताच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. निलेश लोहार या पोलीस कर्मचार्‍याच्या रूपात साक्षात देवानेच माझ्या काकाचे रक्षण केले अशा भावना अशोक ठाकूर यांचा पुतण्या उमेश ठाकूर यांनी व्यक्त केल्या. त्यांनी रावेर पोलीस पोलिसांचे विशेष आभार मानून खाकी वर्दीचा वंदन करून तुमचे उपकार कधीच विसरणार नाही असे सांगून पुन्हा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनाही गहिवरुन आले. आपल्या हातून सत्कर्म घडल्याचा आनंद पोलिसांच्या चेहऱ्यावर यावेळी होता.

रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या सामाजिक कार्याबद्दल रावेर शहरात व तालुक्यात आदराने बोलले जाते. कोरोना महामारीच्या काळात सर्व  कामधंदे बंद झाल्याने आपापल्या गावात पायपीट करून परत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना निलेश लोहार या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करून पोलीस दलाची मान गौरवाने उंचावली होती. अशाच प्रकारे प्रकृती चिंताजनक असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समुदायातील लहानशा बाळाला तातडीने उपचार मिळावे यासाठी निलेश लोहार यांनी वेळेवर केलेले सहाय्य व मदतीमुळे या चिमुकल्या बाळाचे प्राण वाचले होते. सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांच्या अनेक संघटनांनी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन गौरव केलेला आहे.

 

Leave a Reply