मुक्ताईच्या पावन भूमीत गुंडांचा थरार..! रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे सत्य बाहेर येईल का..?

जळगाव राजकीय

जळगाव |सिटीझन मिरर वार्ता

राजकीय सभ्यतेचा मर्डर करणारा दाक्षिणात्य सिनेमातल्या कथानकाला शोभेल असा गुंडांच्या दहशतीचा हैदोस मुक्ताईनगर – बोदवड तालुक्यात मागील काही दिवसात सातत्याने खुल्या आणि छुप्या मार्गाने सुरू आहे.

यात जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण तडफदार आक्रमक नेत्या रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय गुंडांचा माज जिल्ह्याच्या राजकारणातला काळा अध्याय मानावा लागेल.

राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने राजकीय लढाया होत आलेल्या आहेत.मात्र एखाद्यावर प्राणघातक हल्ला करण्याचे राजकीय प्रसंग अपवादात्मक आहेत. रोहिणीताई खडसे यांच्यावर हल्ला करण्याचा इरादा ही सहज झालेली घटना नसून पूर्वनियोजित असावी. यामागे निश्चितपणे कोणातरी “भाऊ” “दादा” चा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष गुंडांना वरदहस्त असल्याशिवाय हल्लेखोर रोहिणीताई खडसे यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत करू शकणार नाहीत.
मुक्ताईनगर तालुक्यात मागील काही दिवसांपासून किंबहुना दोन अडीच वर्षांपासून अवैध धंद्यांचा
” चंद्रोदय” झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. उघडपणे बोलण्याची हिंमत कोणीही करू शकत नसल्याचे नागरिकांच्या बोलण्यावरून ठळकपणे दिसून येत आहे. तोंड उघडले तर..काही खरे नाही अशी भितिग्रस्त मानसिकता लोकांची झालेली आहे. कोणीतरी वाली असावा अशी इच्छा असणाऱ्या लोकांना रोहिणीताई खडसे यांच्या रूपाने लढणारी..भिडणारी नेता आश्वासक वाटत आहे. मागील काही महिन्यांपासून रोहिणी ताई खडसे सातत्याने विविध प्रश्नावर शासनाकडे, प्रशासनाकडे पाठपुरावा करून लक्ष वेधत असल्याने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होऊ लागली आहे. यामुळेच की काय आपले अस्तित्व धोक्यात येईल अशा भीतीपोटी भान हरवून बसलेल्या काही राजकीय कवच घेऊन वावरणाऱ्या अवैध धंदे वाल्यांनी एकजूट करून “चंद्रा”च्या प्रकाशात ए”कांत” ‌‌शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र, चंद्राला जशी पौर्णिमा असते तशी अमावस्या देखील असते याची समज नसल्याने या गुंडांची नेमकी फसगत झालेली आहे. अर्थात गर्भगळीत झालेल्या गुंडांना व त्यांच्या म्होरक्याला रोहिणीताई खडसे यांच्यावर दहशत बसविण्याचा मार्ग योग्य वाटला असावा.
पण, राज्याच्या राजकारणातील मोठे नेते असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या तालमीत तयार झालेल्या रोहिणीताई खडसे या घाबरून जाण्याची संभावना नव्हती व नाहीच. सर्व पत्ते उलटे पडत चालल्याने धास्तावलेल्या गुंडांनी मागील काही दिवसात एका मागून एक चुका करून स्व:त संकट ओढवून घेतल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी बोदवड नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्यासोबत वाद घालणारे,अंगावर धाऊन जात अरेरावी करणारे कोणाचे हितचिंतक आहेत..? रात्री बेरात्री मुक्ताईनगर मध्ये दांगोडो करणारे कोणाचे समर्थक आहेत..?
एका कार्यकर्त्यांच्या बायकोबाबत अत्यंत निर्लज्ज भाषेत संवाद असलेली ऑडियो क्लिप राजकारणातल्या सभ्यतेचा बुरखा टराटरा फाडत आहे. संत मुक्ताबाई,चांगदेवाचा वारसा सांगणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्याच्या राजकारणातील एवढे निंदनीय प्रदर्शन समर्थनीय कसे ठरेल.? महिलांच्या बाबतीत विकृत मानसिकता असणाऱ्या नालायक विकृत गुंडांना कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उघडे पाडलेच पाहिजे.रोहिणीताई खडसे यांनी नेमके हेच केले. त्या दोन – तीन दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्यांच्या मदतीला धाऊन गेल्या. रात्रीच्या वेळेस एका महिलेच्या अंगावर धावून जात वाईट नजरेतून तिला ओढून धक्काबुक्की करण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मिळताच तातडीने रोहिणीताई खडसे त्या महिलेच्या मदतीला धाऊन गेल्या नसत्या तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी महिलेच्या बाबतीत वाईट नजर मनात ठेवणाऱ्या ऑडियो क्लिपचा संदर्भ घेऊन “महिलांच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आमदाराला चोप देईन” असा संताप व्यक्त करणाऱ्या रोहिणीताई खडसे यांची आक्रमकता महिलांना आपली वाटली.मात्र दुसऱ्याच दिवशी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ” मला खडसे पिता – पुत्री यांच्यापासून धोका आहे ” असे गाऱ्हाणे मांडले. वास्तविक तालुक्यातील महीलेबाबत संताप आणणारी लज्जास्पद भाषा वापरणाऱ्या विकृत नालायकांचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी कडक भाषेत धिक्कार करून समाचार घेतला असता तर त्यांची प्रतिमा उजळून निघाली असती. पण तसे न करता नाथाभाऊ आणि रोहिणीताई खडसे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे सांगून आ.पाटील यांनी‌ त्या विकृत कार्यकर्त्या बाबत संशय कायम ठेवला.
द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना असुरी आनंद घेणाऱ्या कौरवांच्या चुकीमुळे महाभारत घडले. मुक्ताईनगर मध्ये असेच महाभारत घडत आहे. महाभारतात कृष्णाच्या साथीने पांडवांनी कौरवांच्या पराभव केला. मुक्ताईनगर मध्ये कौरवांच्या फळीत नेमके कोण..? पांडवांना कृष्ण भेटेल का..? असे प्रश्न अनेकांना पडत आहे. एक मात्र खरे, रोहिणी ताई खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने गुंडांना पळ काढावा लागला.
यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी रात्री रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.या घटनेचे पाळेमुळे पोलीस शोधून काढतीलच..मास्टर माईंड सुद्धा समोर येईल. पण..मुक्ताई नगर तालुक्यातील अवैध धंदे बंद केले जातील का..? गुंडांच्या उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याशिवाय त्यांच्या दहशतीला लगाम बसणार नाही.

Leave a Reply