खळबळजनक : मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं २५०० कोटींची मागणी केल्याचा भाजपा आमदाराचा दावा ; कर्नाटकात राजकीय चर्चेला उधाण

राजकीय राष्ट्रीय

बंगळूरू / सिटीझन मिरर वार्ता

कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींची मागणी करण्यात आली होती असा दावा केल्याने कर्नाटकात खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते  डीके शिवकुमार यांनी केली आहे.

लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना विजयपुरा शहराचे आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी दावा केला की, नवी दिल्लीतील काही लोक त्यांच्याकडे २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते.

मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री होण्यासाठी २५०० कोटी रुपये तयार ठेवण्यास कोणी कसं सांगू शकतं? असा सवाल बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार काँग्रेसचे कर्नाटक राज्याचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांच्याकडं सर्वकाही उपलब्ध असताना, भाजपला आणखी कोणते पुरावे हवे आहेत? आम्ही कोणाचाही राजीनामा मागत नाहीय. पण,२५०० कोटींच्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर कोणी दिली, हे भाजपनं सांगावं. यत्नाळ-पाटील हे माजी मंत्री आहेत, त्यामुळं त्यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करू नये, असंही शिवकुमारांनी म्हटलंय. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. तसेच हा राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर देशात चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

 

Leave a Reply