जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला अमळनेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसह नागरिकांनी दिला बंधुभावाचा संदेश

जळगाव

पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेत मान्यवरांसह सर्वधर्मीय नागरिकांनी संदेश लिहून घेतला सहभाग

 


  अमळनेर /सिटीझन मिरर वार्ता

राज्यात मागील काही दिवसांपासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवूर्त्ती कडून सुरू असल्याचे दिसत असताना अमळनेर शहरातील जनतेने आपापसातील बंधुभाव जोपासत जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक एकोप्याची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प केला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेतून अमळनेर पोलिसांनी शहरातील तिरंगा चौकात जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहिमेत जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आज अमळनेर शहरात आले होते. त्यांनीही जातीय सलोखा मोहिमेत सहभाग नोंदवून फलकावर भाईचाराचा संदेश लिहून स्वाक्षरी केली. आ.अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ.अनिल शिंदे,  हाजी शेखा मिस्त्री, राजेश पाटील,विवेक पाटील, सुरेश पाटील,अॅड.यज्ञेश्वर पाटील, देविदास देसले, एजाज मलिक यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी अभिनव संदेश लिहून जातीय सलोखा टिकवून ठेवण्याची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प केला.

संत सखाराम महाराज यांची पवणभुमी, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी,श्रीमंत प्रतापशेठ यांची उद्यम भूमी अशी ओळख असलेल्या अमळनेर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शहरातील नागरिकांनी नेहमीच गुण्यागोविंदाने सर्वधर्मीय लोकांशी प्रेमाचे नाते कायम ठेवले आहे. त्याचा परिचय जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेत दिसून आला.

आ.अनिल भाईदास पाटील यांनी संदेश लिहून जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला.

शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्ते, सामाजिक व धार्मिक संघटना, पत्रकार बांधव, विविध संस्थेचे ट्रस्टी, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, डॅाक्टर्स, वकील, इंजीनियर, व्यापारी, शांतता व महीला समिती सदस्य, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य , पोलीस मित्र, महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक, महिला व मुले, सराफ-व्यापारी असोसिएशन, प्रिंटींग असोसिएशन, सर्व सामाजिक-सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच अमळनेर शहर व तालूकावासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून संदेश देत स्वाक्षरी केली.

यशस्वीतेसाठी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

    स्वाक्षरी मोहिमेतील संदेशांची चर्चा

          या स्वाक्षरी मोहिमेत विविध मान्यवरांनी आपले संदेश लिहून स्वाक्षरी केली.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लिहलेला संदेश लक्षवेधी ठरला.

त्यामुळे या संदेशांची शहरात विशेष करून चर्चा होती. त्यात खास अशा संदेशावर अनेकजण चर्चा करताना दिसून आले. यात वो दिलो मे आग लगायेगा, मै दिलोंको आग बुझाऊंगा, उसे अपणे काम से काम है. मुझे अपणे काम से काम हे, जय हिंद, जय महाराष्ट्र असा संदेश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लिहिला. तर कोई धर्म बुरा नही होता, इंसान बुरा होता है…और बुरे इंसान का कोई धर्म नही होता, असा संदेश पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लिहिला

Leave a Reply