कोरोनाकाळातील गांव पाडयां मधली व्यथा

जिल्हा नंदुरबार

प्यायला नाही पाणी तर हात धुवायला कुठून येणार??

नंदुरबार :- जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळ ह्या गावच्या बुरुमपाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्याने पहाडात पायवाटेने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ७ किलोमीटरची रोजची पायपीट, गुरांसाठी त्यांच्यासह नागरिकांना ७ किमी पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
गावात जाण्यासाठी पक्केच नाही तर साधे कच्चे रस्ते सुद्धा नसल्याने गावात पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याचे आदिवासिंच्या हक्क व अधिकारांसाठी आवाज उठवीणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी म्हटले आहे.यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
गेल्यावर्षी या गावात गाढवावरून पाणी पोहचवण्याची नामुष्की सरकारवर आली होती. कारण कुयलिडाबर ला अजून रस्ता नाही. आत्ता कोरोना चे संकट असताना ह्या बाया-बापडयासह लहान लहान मुलांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
लोकसंघर्ष मोर्चाचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, यासंदर्भात माहिती देताना प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले की, पुढच्या वर्षी गांव पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी जंगल, नदी यांचे संवर्धन करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. गावातील सामूहिक वन व्यवस्थापन समितीनेही यासाठी पुढाकार घेतला असून सातपुड्यातील गावांनी, तरुण कार्यकर्त्यांनी व लोक समन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्च्याच्या माध्यमातून सातपुडा संवर्धन मोहीम सुरू केली आहे .या मोहिमेत सहभागी व्हा व सातपुड्यातील जंगल पुन्हा उभे करण्यासाठी व सातपुड्यातील नद्या संवर्धनासाठी आपणही आपले योगदान ,तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन, आपल्या आयडिया, व वेळेच्या तसेच वस्तूच्या स्वरूपात देवून सातपुड्यातील या गावांसोबत उभे राहू या असे आवाहन प्रतिभाताई शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *