रेती मुरूम चोरांचा पाठीराखा कोण..? ट्रॅक्टर जेसीबी कारवाई विना का सोडले..? असंख्य प्रश्नांच्या गराड्यात गौण खनिजाचे अर्थकारण..

जळगाव

रावेर दिनांक १४ मे

कोरोना पासून बचावासाठी सुरू असलेल्या लाॅकडाउनचा फायदा घेत रावेर तालुक्यात रेती मुरूम चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महसूल प्रशासनाने अर्थकारण लक्षात घेत रेती मुरूम तस्करांना अभय दिले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी पाल रस्त्याजवळ एका गावात अनधिकृत मुरूम वाहतूक करणारे तिनं ट्रॅक्टर व जेसीबी महसूल विभागाने पकडले होते. मात्र या वाहनांवर कारवाई न करता त्यांना गुपचुपपणे सोडून दिल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

जिल्हाभरात कोरोना पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. रावेर तालुक्यातही प्रशासकीय यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केलेले आहे. मात्र याचा फायदा उचलत महसूल विभागात बसलेल्या काही सतुर डोक्यांनी हुशारी लढवत रेती मुरूम तस्करांना अभय देत आर्थिक गणिते साध्य करून घेतली आहेत. पाल रस्त्यावर अनधिकृत मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी महसूल विभागातील पथकाला आढळून आले होते. मात्र अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नसल्याने दाल मे कुछ काला है असा सूर उमटत आहे. यासंदर्भात समजलेली माहिती अशी की पाल रस्त्यावर अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्या जेसीबीचा मालक हा धनदांडगा व तगडा असामी असल्याचे बोलले जात आहे. ही बाब काहींना समजल्याने त्यांनी जेसीबी नेमके कशासाठी जमा करण्यात आले आहे याची विचारणा तहसील कार्यालयात केल्यानंतर शासकीय कामासाठी जेसीबी आणण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र शहरातच काहींकडे जेसीबी असताना पाल रस्त्यावरून जेसीबी मागवण्याची नेमके कारण काय याचे उत्तर मात्र महसूल यंत्रणेकडे नव्हते. यामुळे जप्त करण्यात आलेले तिघा ट्रॅक्टर व जेसीबी यांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *