कोरोना विषाणूवर शोधली मॉडर्ना कंपनीने लस; प्राथमिक चाचणी दिलासादायक असल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय

मुंबई दिनांक १९ मे

जगभरात कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने निर्माण केलेल्या लसीचा प्राथमिक चाचणी निकाल आशेचा किरण निर्माण करणारा आहे.असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.मॉडर्नाने तयार केलेल्या लसीचा डोस आतापर्यंत आठ जणांना देण्यात आला आहे. त्यानंतर या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे दिसले. त्यामुळे जगात ‘कोरोना’वरील पहिली लस सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यातच इस्रायलचच्या संरक्षण मंत्र्यांनीही कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला होता. “आयआयबीआर या संस्थेने तयार केलेली प्रतिजैविके मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना व्हायरसवर हल्ला करतात. ही लस रुग्णाच्या शरीरातील सर्व कोरोना विषाणूंचा सर्वनाश करते. त्यामुळे विषाणू शरीराच्या इतर भागात पसरत नाही”, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री बेन्नेट यांनी केला होता.दरम्यान, या लसीचं क्लिनिक ट्रायल किंवा ह्यूमन ट्रायल झालं आहे का? याबाबत बेन्नेटे यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
आता अमेरिकेच्या मॉडर्ना बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीच्या दाव्यानुसार पहिल्यांदाच ‘कोरोना’ विषाणूची लस सुरक्षित असल्याचे दिसते. आठ निरोगी व्यक्तींना लसी देण्यात आल्या असून त्यांचे निकाल आशादायक आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीचे दोन डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही चाचणी सुरु झाली होती, अशी माहिती मॉडर्ना कंपनीने दिली.
चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ६०० जणांचा समावेश असेल, असे मॉडर्नाने सांगितले. तर जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात हजारो जणांना समाविष्ट केले जाईल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॉडर्नाला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्याची मान्यता दिली आहे.
मॉडर्ना ही आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी करणारी पहिली औषध कंपनी आहे. कंपनीचा तिसरा टप्पा यशस्वी झाला तर कंपनी लस बनवण्यासाठी अर्ज करु शकते.

1 thought on “कोरोना विषाणूवर शोधली मॉडर्ना कंपनीने लस; प्राथमिक चाचणी दिलासादायक असल्याचा दावा

  1. Covid19 mule sarv jag astat zalay tyamule pratyakalach aasha ahe ki lavkar yavar aushadh yave aani kharch lavkar ya sankat arun sarv jagala mukti milo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *