पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल पाहून गहिवरली खाकी वर्दी; रावेरचे पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांची निष्काम कर्मसेवा

जळगाव

रावेर (नजमोद्दिन शेख) दिनांक १९ मे

कोरोना विषाणूमुळे अवघे जग ठप्प पडले आहे. भारतालाही या जीवघेण्या रोगाने विळखा घातल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लाॅक डाऊन घोषित केला. यामुळे देशभरातील दुकाने बंद आहेत. कारखाने, कंपन्या बंद पडले आहे.परिणामी हाताला काम नाही आणि पोटाला भाकर नाही अशा विवंचनेत सापडलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यात आपल्या मूळ गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे लोंढेच्या लोंढे परप्रांतीय मजूर रस्त्यांवर पायी जाताना दिसू लागले. यात मुंबईकडून जळगाव जिल्ह्यातून रावेर मार्गे जाणाऱ्या मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार झारखंड येथील परप्रांतीय मजुरांची संख्या लक्षणीय आहे.चार-पाचशे किलोमीटरचा प्रवास पायीच करणाऱ्या मजुरांच्या व्यथा आणि वेदना त्यांच्या चेहर्‍यावर अगदी स्पष्ट दिसत होत्या. अन्न-पाण्यावाचून चालणाऱ्या मजुरांसाठी कोरोनापेक्षाही भुकेची तळमळ जीवघेणी ठरत असल्याचे विदारक चित्र होते. यात नवजात बालकांपासून ८०-९० वर्षांच्या वृद्धांपर्यंत जाणाऱ्यां मजुरांचे चेहरे भयानक वास्तव मांडत होते. या परप्रांतीय मजुरांचे लोंढे पाहून रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांच्यातल्या माणसाची करुणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी पदरमोड करून अनवाणी चालणाऱ्या अनेक मजुरांना चपला, त्यांच्या जेवणाची व्यवस्था बिस्किटे,फळे सलग वाटप करणे सुरू केले. त्यांची निष्काम सेवा पाहून अनेकांचे हात निलेश लोहार हे करीत असलेल्या मदत कार्यासाठी पुढे सरसावले. पोलीस म्हटला की तो अत्यंत कठोर निर्णय असेच सामान्यांचे मत असते. मात्र पोलिसांच्या खाकी वर्दी आड दडलेला माणूस निलेश लोहार यांच्या कार्यातून जन भावनेच्या आदरास पात्र ठरला आहे. या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसद्वारे सोडण्यासाठी ही त्यांनी सक्रिय कर्तव्य निभावले. त्यांच्या कार्याची वरिष्ठांनीही दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

1 thought on “पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल पाहून गहिवरली खाकी वर्दी; रावेरचे पोलीस कर्मचारी निलेश लोहार यांची निष्काम कर्मसेवा

  1. खरच आपल्या ह्या दैवीय कार्यासाठी आपले जीतके कौतुक करावे तितके कमीच ठरेल। आज पर्यंत खाकीला फक्त सलाम केला आज अक्षरश: वंदन करावेसे वाटते। तुम्हला दंडवत सर।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *