पुसद तालुक्यात होम क्वारनटाईन इसमाचा संशयास्पद मृत्यू; डॉक्टर अभावी प्रेत दोन तास रस्त्यावर पडून

विदर्भ

पुसद (राजेश ढोले) दिनांक १९ मे

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राची व राज्याची सर्व शासकीय यंत्रणा जीव ओतून काम करीत असताना पुसद तालुक्यात मात्र प्रशासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. हुडी गावातील होम क्वारनटाईन असलेल्या ५२ वर्षीय इसमाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या इसमाचा मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर पडून होता. या व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच रुग्ण वाहिका आली. मात्र या रुग्णवाहिकेत कोणताच डॉक्टर नसल्याने आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील नारायणगाव येथून मयत व्यक्ती पत्नीसह हुडी गावात आला होता. हुडी गावाजवळ येहळा शेत शिवारात तो पत्नीसह मुक्कामी होता.या दाम्पत्याच्या हातावर होम क्वारनटाईनचा शिक्का मारला आहे. गावकऱ्यांनी या जोडप्यास आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिल्यामुळे हे नवरा बायको हुडी गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद शहरात मंगळवारी दुपारी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पायीच गेले होते. तेथून गावी परत येत असताना रस्त्यातच या इसमाला अस्वस्थ वाटू लागल्याने ते अचानक खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या डेड बॉडीला कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही हात लावायला पुढे आले नाहीत. होम क्वारनटाईन इसमाचा मृत्यू झाल्याची खबर गावकऱ्यांकडून आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर काही वेळातच तेथे ॲम्बुलन्स दाखल झाली. त्यापूर्वीच या इसमाच्या मृत्यूची बातमी समजताच उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड देखील तेथे तातडीने पोहोचले. मात्र रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांचा संताप अनावर झाला. पुसद नगर परिषदेकडे पीपीई किट उपलब्ध नसल्याचे हास्यास्पद कारण यावेळी सांगण्यात आले. तब्बल दोन तास डॉक्टरांची वाट पाहूनही कोणीही आले नसल्याने अखेर खुद्द उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड हे वैद्यकीय शिक्षित असल्याने त्यांनी स्वतः या या इसमाची तपासणी केली. यावेळी तो मृत झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच दरम्यान तहसीलदार वैशाख वाहूरवार व पुसद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजी गवळी हे देखील घटनास्थळी हजर झाले.

कोरोना पासून बचावाकरिता केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना करत असताना पुसद तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला या रोगाचे कोणतेच गांभीर्य दिसत नसल्याचा प्रत्यय आला आहे. पुसद तालुक्यात बाहेरून किती नागरिक आले आहेत, यापैकी होम क्वारनटाईन शिक्का हातावर असलेले किती व्यक्ती आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर निगराणी करण्याची गरज असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गावर उपाय योजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गुलदस्त्यातच आहे. मात्र त्याच्या मृत्यूमुळे हुडी गाव भितीच्या सावटाखाली आले आहे.

Leave a Reply