महिला रुग्णांच्या यातना दूर करून शिवाजीनगरचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची मागणी; मनपा आयुक्तांची भेट घेऊन महिला रुग्णांना होत असलेल्या त्रासाकडे वेधले लक्ष

जळगाव

जळगाव दिनांक २० मे

शिवाजी नगर मधील महानगरपालिकेचे भिकमचंद जैन रुग्णालय बंद करण्यात आल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या यातना लक्षात घेऊन मनपाने कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून हा दवाखाना पूर्ववत सुरू करावा यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे पुढे सरसावले आहेत. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन दवाखाना बंद झाल्यामुळे महिला रुग्णांना सहन करावे लागणारे हाल याची माहिती दिली.
जळगाव शहर महानगरपालिकेकडून शिवाजीनगर येथे खूप वर्षापासून भिकमचंद जैन रुग्णालय चालविले जात होते. या रुग्णालयात प्रसूतीसाठी शिवाजीनगर परिसरासह शहरातील अनेक ठिकाणच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबांच्या महिला दाखल होत असत. मात्र काही दिवसांपूर्वीच पुरेश्या कर्मचारी संख्या अभावी हा दवाखाना मनपाने बंद केला आहे. यामुळे महिला रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात जावे लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेहमीच मोठी गर्दी होत असल्याने तसेच खाजगी दवाखान्याचा खर्च गरीब कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असल्याने शिवाजीनगरचा दवाखाना महिला रुग्णांसाठी खूप सोयीचा होता. याच दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केल्यामुळे नशिराबादच्या पुढे साकेगाव परिसरात जळगाव शहरापासून तब्बल १७ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना इतक्या दूर उपचारांसाठी जावे लागत असून त्यापूर्वी या महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात (सध्या कोविड रुग्णालय ) कोरोना चाचणी देण्यासाठी जावे लागत आहे. या परिस्थितीत महिला रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होण्याची भीती आहे. प्रसूतीसाठी गोदावरी रुग्णालय खूप दूर असल्याने वेळीच उपचार जर मिळू शकले नाही तर महिला रुग्ण व पोटातील बाळ यांच्या जीवितालाही धोका आहे, याकडे मनपा आयुक्तांचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी लक्ष वेधले.ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शिवाजीनगर मधील भिकमचंद जैन रुग्णालय पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आयुक्तांची भेट घेतली. यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन शिवाजीनगर येथील मनपा चा दवाखाना सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply