रेशन धान्य घोटाळा: तपासाअंती नायब तहसीलदारांना अटक

मराठवाड़ा

बीड, दिनांक २२ मे

गेवराई तालुक्यात उघडकीस आलेल्या रेशन धान्य घोटाळ्याची फिर्याद देणाऱ्या नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना पोलिसांनी तपासाअंती आज दुपारी ताब्यात घेतले आहे. रेशन घोटाळ्यात महसूल अधिकाऱ्यांना अटक झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच गेवराई येथे रेशनचे गहू तांदूळ आणि साखर व सहा मालवाहू ट्रक असा तब्बल एकूण 70 लाख रुपयांचा माल काळ्याबाजारात विक्री साठी गोदामात लपवून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी भाजपा नगरसेविकेचे पती अरुण म्हस्के यांच्यासह त्यांच्या भावावर गेवराई पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अरुण म्हस्के हे फरार आहेत तर त्यांच्या भावासह गोदामपाल संजय राजपूत यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना समर्पक उत्तर देऊ न शकल्याने नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना आज शुक्रवारी दुपारी एक वाजता एसआयटी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी माध्यमांना दिली. रेशन घोटाळ्यात खुद्द महसूल अधिकाऱ्यांना अटक झाल्यामुळे बीड जिल्ह्यात तातडीने ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *