माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला अखेरचा दंडवत; कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याची चर्चा

राज्य

कन्नड, दिनांक २३ मे

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून त्यांनी आपल्या धडाकेबाज राजकारणातुन संन्यासाची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.निवृत्ती जाहीर करताना हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे की, “लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्यांच्या राजकारणातुन निवृत्ती घेण्याच्या घोषणेने मागे कौटुंबिक कलह असल्याची चर्चा आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी अचानक संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं व्हिडीओत सांगितलं आहे. जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले होते. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते.

माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो”. असे त्यांनी म्हटले आहे.

“प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,” असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांचे राजकारण नेहमीच धडाकेबाज राहिले आहे. स्पष्टवक्ता अशी त्यांची राजकारणात ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *