पडद्यामागची बातमी: डॉ. भास्कर खैरे यांच्या उचलबांगडीचे खरे शिल्पकार कोण…?

जळगाव

जळगाव, दिनांक २५ मे

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे आदेश येताच अनेकांनी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.”बदली माझ्यामुळेच…, माझीच तक्रार होती..” अशाप्रकारे अनेकांनी डॉ.खैरे यांच्या बदलीचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून आयती प्रसिद्धी घेण्याची संधी सोडली नाही. प्रत्यक्षात डॉ.खैरे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावरून का व कोणाच्या तक्रारीमुळे उचलबांगडी झाली याचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बदलीचे सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी विनोद देशमुख व अर्बन सेलचे समन्वयक मूविकोराज कोल्हे असल्याचे समोर आले.
‌ हे खरे आहे की, डॉक्टर भास्कर खैरे यांच्या कार्यपद्धतीबाबत शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांची नाराजी होती. यातच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.एन. एस. चव्हाण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यात कोणताच समन्वय नसल्याने रुग्णालयाच्या कामकाजात अनागोंदी स्पष्टपणे दिसत होती. या दोघांमधील मतभेद अनेकदा समोर आले. असे असले तरी जिल्ह्यात नवीनच मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे प्रयत्न निश्चितपणे नाकारता येण्यासारखे नाहीत. मग असे नेमके काय घडले की त्यांना शहरातील अनेकांच्या नाराजीचे कारण व्हावे लागले..?
याचे उत्तर जळगाव जिल्ह्यात चौफेर विस्तारत गेलेल्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होय. जिल्ह्यात कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या उपचारात होत असलेला गलथानपणा डॉ.भास्कर खैरे यांच्यावर नाराजीस कारणीभूत ठरला. स्थानिक पातळीवर अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी डॉ. भास्कर खैरेंच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. काहींनी समाज माध्यमे,तर काहींनी आमदार, लोकप्रतिनिधी ,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रारी केल्या. मात्र तक्रारीच्या खरेपणासाठी लागणारे पुरावे कोणाकडेच नव्हते, कोणीच सादर केले नाही. पुराव्याअभावी झालेल्या तक्रारींना अर्थ तरी असतो काय..? यामुळेच अशा तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. मात्र अश्विनी विनोद देशमुख व त्यांचे सहकारी कार्यकर्ते मूविकोराज कोल्हे यांनी पुरावे सादर करून थेट उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे डॉ. भास्कर खैरे यांच्या विरोधात तक्रार केली. काही पदाधिकाऱ्यांनी ट्यूटर वर नाराजी व्यक्त केली. ट्विटरवर नाराजी करून बदली होणे शक्य कसे होईल.? हे लक्षात घेऊन “सिटीजन मिरर” ने डॉ. भास्कर खैरे यांच्या अधिष्ठाता पदावरून झालेल्या उचलबांगडीमागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मिळालेली माहिती, पुरावे व उच्चस्तरावर झालेल्या गतिमान हालचाली पाहता जळगाव मनपाच्या माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी विनोद देशमुख व अर्बन सेलचे समन्वयक मूविकोराज कोल्हे हेच डॉ.भास्कर खैरे यांच्या उचलबांगडी मागचे खरे शिल्पकार असल्याचे समोर आले.
कोरोना बाधितांवर तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कोविड रुग्णालय डॉ. भास्कर खैरे यांच्या अधिपत्याखाली आले. कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याचे रुग्णांचे काही महत्वपूर्ण व्हिडिओ समोर आले. यासंदर्भात वस्तुस्थितीची खात्री करून अश्विनी विनोद देशमुख, मूविकोराज कोल्हे यांनी गेल्या महिन्यातच ७ एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे थेट तक्रार केली होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (कोविड रुग्णालय) अॅडमिट संशयित कोरोना रुग्णांची गैरसोय होत असुन त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही. सुरुवातीला रुग्णांचे स्वॅब चाचणी नमुने यायला ७/८ दिवस लागत होते.त्यावेळेस संशयित व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वर्गीकरण करण्यात आले नसल्याने सर्वच रुग्णांना एकत्र ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. संशयित व पॉझिटिव्ह एकत्र ठेवण्यात आल्याने कोरोना संसर्गाचा सर्वांनाच धोका निर्माण झाला होता. संशयित व पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना रुग्णांना आंघोळीची व्यवस्था याठिकाणी नव्हती. या रुग्णांची पाच-सात दिवस आंघोळ झालेली नव्हती. बाथरूममध्ये पाणी साचून राहत होते. संशयित व पॉझिटिव रुग्णांचे बेड अत्यंत जवळजवळ होते. रुग्णांना पिण्यासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. याकडे अश्विनी देशमुख व मूविकोराज कोल्हे आणि सहकाऱ्यांनी डॉक्टर भास्कर खैरे यांचे लक्ष वेधून रुग्णांना सुविधा पुरविण्याबाबत सांगितले. मात्र त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे हे कोरोना वार्डात राउंडलाही जात नसल्याचे दिसून आले. रुग्णालयातील अनागोंदी व गलथान कारभार पाहून सौ.अश्विनी विनोद देशमुख यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचेकडे स्पष्ट तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेऊन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना फोनवर विचारणा केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र झालेली तक्रार खोटी असून कोरोना बाधित रुग्णांची योग्य पद्धतीने निगा राखली जात असल्याचे डॉ.भास्कर खैरे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सांगितले. परंतु तक्रारीची खात्री करून घेण्यासाठी अजितदादा पवार यांनी देशमुख यांना फोनवर संपर्क करून तक्रारीशी संबंधित पुरावे असतील तर ई-मेल ने तातडीने पुरावे पाठविण्यास सांगितले होते. तसेच मुख्यमंत्र्यांकड ही ईमेलने पुरावे असतील तर तक्रार करण्यास सांगितले होते.”कोरोना सारख्या महामारीच्या भयानक परिस्थितीत या संकटाच्या काळात कोणाचेही बेजबाबदार वागणे खपून घेणार नाही.”अशा खास शैलीत अजितदादा पवारांनी देशमुख यांना सांगितले. त्यानुसार अजितदादांकडे ईमेलने, व्हाट्सअपद्वारे व्हिडिओ वगैरे सर्व पुरावे पाठविण्यात आले. याच वेळेस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल संशयित व कोरोनाबाधित रुग्णांच्या समस्याबाबत निवेदन अश्विनी विनोद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही योग्य दखल घेतली नाही. ही माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समजताच त्यांनी फोन करून जिल्हाधिकार्‍यांना यासंदर्भात विचारणा केल्याचीही माहिती आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित असल्याचीही माहिती समजून आली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांची कोणतीही गैरसोय होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अजितदादांना सांगत तक्रार खोटी असल्याचे सांगितले. पण मिळालेले पुरावे व तक्रारीच्या खरे-खोटेपणाची पडताळणी अजितदादा पवार यांनी सुरू केल्यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील गलथानपणाची खात्री पटल्यानंतर अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची पदावरून उचलबांगडी होण्याचे निश्चित झाले. याची माहिती पक्षांतर्गत कही पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनीदेखील ट्विटर व ई-मेलद्वारे तक्रार, निवेदन पाठविले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित अधिष्ठातापदी डॉ. मीनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश राज्याच्या आरोग्य संचालनालयाने दिले. यामुळे डॉ.भास्कर खैरे यांना अधिष्ठाता पदावरून पायउतार व्हावे लागले. याचे श्रेय घेण्यासाठी अनेकांनी सोशल मीडिया, प्रसार माध्यमे, मिळेल ती प्रसिद्धीची साधने यात “मीच तक्रार केली.., माझ्याच तक्रारीमुळे…”असा प्रसिद्धीचा फंडा वापरून घेतला.

जिल्हाधिकारीही रडारवर

डॉ. भास्कर खैरे यांच्यानंतर लवकरच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचीही बदली होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने वरिष्ठस्तरावर हालचाली गतिमान झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव निवारण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन कारभाराचे अनेक प्रकरणे या काळात घडली आहेत व घडत आहेत. कोणीच कोणाला जुमानत नसल्याचेही विदारक चित्र यानिमित्ताने जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *